वाधवान बंधूंना CBI च्या पथकाने महाबळेश्वरमधून घेतलं ताब्यात, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – डीएचएफएल आणि येस बँक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी कपिल आणि धीरज वाधवान यांना आज (रविवारी) केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) पथकाने महाबळेश्वर येथून ताब्यात घेतले असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. तसेच त्यांच्या लेखी विनंतीनुसार सर्व आवश्यक मदत आणि 1+3 गार्डसह एक्स्कॉर्ट वाहन देण्यात आले असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. वाधवान कुटुंबियांना काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनच्या काळात महाबळेश्वरमध्ये गेल्यामुळे ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना 14 दिवसांच्या क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते.


वाधवान कुटुंबाचा 14 दिवसांचा क्वरंटाईन कालावधी बुधवारी संपल्याने त्यांना महाबळेश्वर येथील बंगल्यात ठेवण्यात आले होते. वाधवान बंधू आणि त्यांच्या कुटुंबातील 21 सदस्यांचा क्वारंटाईनचा कालावधी बुधवारी दुपारी संपल्यानंतर त्यांना सीबीआयच्या ताब्यात देण्यास आम्ही तयार आहोत. सीबीआयने रितसर मागणी करावी, असे म्हटलं होते. आम्ही सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपाससंस्थांना त्यासाठी पत्र पाठवल्याचे सांगण्यात आले होते.

लॉकडाऊन काळात मुंबईहून महाबळेश्वरला फिरायला गेलेल्या वाधवान कुटुंबियांना 7 एप्रिल रोजी सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. राज्याचे गृह विभागाचे सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांनी त्यांना लॉकडाऊनमध्ये प्रवास करण्याची परवानगी देणारे पत्र दिले होते. याच पत्रामुळे त्यांनी मुंबई ते सातारा असा प्रवास केला होता. हा प्रकार उघडकीस आल्यावर अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले.