वाधवान कुटुंबियांना CBI नं ताब्यात घ्यावं, ते परदेशात पळून जाणार नाहीत : गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्याप्रमाणे मागे काही जण लंडनला पळून गेले तसे, कोणीही पळून जाणार नाही. वाधवान कुटुंबियांची क्वारंटाईनची मुदत आज दुपारी संपत आहे. सीबीआय त्यांना ताब्यात घेईपर्यंत ते पोलिसांच्या ताब्यात राहणार आहेत, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगत भाजपला टोला लगावला आहे.

गृह विभागाचे अतिरिक्त सचिव अमिताभ गुप्ता यांचे पत्र घेऊन वाधवान कुटुंबियांनी खंडाळा ते महाबळेश्वर असा लॉकडाऊन काळात प्रवास केला होता. हा प्रकार भाजपचे किरीट सोमय्या यांनी उचलून धरला होता. त्यावरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सीबीआयपासून वाधवान कुटुंबाला वाचविण्यासाठीच महाराष्ट्र सरकार प्रयत्न करीत असल्याचा आरोप भाजपने केला होता.

या घटनेनंतर पोलिसांनी बाधवान कुटुंबाला महाबळेश्वरमध्ये क्वारंटाईन करुन ठेवले होते. तसेच त्यांच्यावर १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांच्या पाचही आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत.
याबाबत बुधवारी सकाळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्हिडिओ प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यात त्यांनी किंगफिशरचा मालक विजय मल्ल्या यांच्या नावाचा उल्लेख न करता सांगितले की, यापूर्वी भारतातून काही जण लंडनला पळून गेले होते. त्याप्रमाणे वाधवान कुटुंबिय पळून जाऊ शकणार नाही.

ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्या क्वारंटाईनची मुदत आज दुपारी २ वाजता संपणार आहे. त्यानंतर सीबीआयने त्यांना ताब्यात घ्यावे. जोपर्यंत सीबीआय त्यांना ताब्यात घेत नाही, तोपर्यंत वाधवान कुटुंबीय पोलिसांच्या ताब्यात राहतील. पालघरच्या घटनेत कोणताही जातीय वाद नाही. काही जणांनी जाणीवपूर्वक त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिसांनी पुढील ८ तास १०१ जणांना अटक केली आहे.