वाघोलीतील नागरिकांचे पाण्यासाठी PMRDA कार्यालयासमोर आंदोलन

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन – वाघोली(ता:हवेली) गावासाठी २२ कोटी रुपयांची वाढीव नळ पाणीपुरवठा योजना पीएमआरडीएने मंजूर करून १९ सप्टेंबर २०१९ रोजी वर्क ऑर्डर दिली असतानाही ठेकेदाराने काम सुरु केले नसल्याने वाघोली प्रॉब्लेम सॉल्वर ग्रुपचे सदस्य व नागरिकांच्या वतीने औंध येथील पीएमआरडीए कार्यालयासमोर बुधवारी (दि.१७) सोशल डीस्टन्सिंग पाळून आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन पीएमआरडीएला दिल्यानंतर पाणीपुरवठा योजनेचे काम लवकरात लवकर चालू करण्याचे आश्वासन आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले.

वाघोली हे गाव पुणे महानगरपालिकेच्या शेजारी असल्याने अतिशय वेगाने नागरिकीकरण होणारे गाव आहे. वाघोली गावाची लोकसंख्या सध्या अंदाजे दोन ते अडीच लाख असून एवढ्या मोठ्या लोकसंख्येला मुख्य गावठाण, वाड्या, वस्त्या, नवीन प्लॉटिंग मुळे विकसित होत असलेले भाग, सोसायटी रहिवाशी, भविष्यात विकसित होणारा परिसर या सर्व ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा मुख्य प्रश्न आहे.

तत्कालीन लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर पीएमआरडीएने २२ कोटी रुपयांची वाढीव नळ पाणीपुरवठा योजना वढू डॅमपासून मंजूर केली. या कामाची वर्क ऑर्डर १९ सप्टेंबर २०१९ रोजी देण्यात आली आहे. वाढीव नळ पाणीपुरवठा योजनेची वर्क ऑर्डर देऊन ८ महिने होऊन गेले, परंतु सदर योजनेचे कामकाज वारंवार पाठपुरावा करूनही अजून कोणत्याही प्रकरे सुरू झाले नाही. त्यामुळे बुधवारी (दि.१७) सकाळी पीएमआरडीए कार्यालयाच्या समोर सोशल डीस्टन्सिंगचे पालन करून प्रॉब्लेम सॉल्वर ग्रुपचे सदस्य व वाघोलीतील नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

यानंतर पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार व नियोजनकार गीतेकर यांच्याशी वाघोलीतील सर्व समस्यांविषयी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर सदर योजनेचे काम चालू होईल असे आश्वासन यावेळी नागरिकांना देण्यात आले. आयुक्त विक्रम कुमार यांच्यासोबत वाघोली मधील इतर प्रश्नांवर चर्चा करण्यात आली तसेच कचरा प्रश्न व डीपी रोडचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहे असे आश्वासन आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले असल्याचे माजी उपसरपंच रामकृष्ण सातव, संदीप सातव यांनी सांगितले.

अधिकाऱ्याच्या आश्वासनांना प्रमाणे हे काम जर 15 दिवसाच्या आत चालू झाले नाही तर वाघोलीतील नागरिकांच्या वतीने मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल