आता तिकिटांची प्रतीक्षा यादी संपणार; रेल्वेची महत्त्वपूर्ण योजना

नवी दिल्ली : स्वस्त आणि आरामदायी प्रवास करण्यासाठी नेहमीच रेल्वेला प्राधान्य दिले जाते. मात्र तिकीट निश्चित झाले नाही तर गाडीची वाट पाहावी लागते. शेवटच्या क्षणापर्यंत आपले तिकीट निश्चित झाले आहे कि नाही हे समजत नाही. मात्र आता भारतीय रेल्वेने आखलेल्या ‘नॅशनल रेल प्लॅन (एनआरपी) २०३०’ अंतर्गत रेल्वे तिकिटांची प्रतीक्षा यादी संपविण्यात येणार असून, सर्व तिकिटे निश्चित (कन्फर्म) करण्यात येणार आहेत. दरम्यान ही नवी योजना सार्वजनिक सल्लामसलतीसाठी, तसेच विविध हितधारक आणि मंत्रालयाकडून अभिप्राय मागविण्यासाठी सार्वजनिक करण्यात येणार आहे.

‘एनआरपी २०३०’मध्ये पायाभूत सुविधांची उभारणी आणि महसूलनिर्मिती यावर लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याने रेल्वेच्या मालवाहतुकीत वाढ होईल तसेच महसूलही वाढेल. देशातील एकूण मालवाहतुकीत ४७ टक्के हिस्सेदारी मिळविण्याची रेल्वेची योजना आहे. २०३० पर्यंत रेल्वे आणखी चार समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर उभारणार आहे. नवे मालवाहतूक कॉरिडॉर सरकारी-खाजगी भागीदारीत (पीपीपी) उभारले जातील. त्यामुळे रेल्वेचा मालवाहतूक काळ कमालीचा कमी होईल. परिणामी मालवाहतुकीचे दर कमी करणे रेल्वेला शक्य होईल.

 त्या संदर्भात बोलताना रेल्वेच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की,
नव्या धोरणात खाजगी क्षेत्राला आकर्षित करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. २८०० कि.मी. लांबीचे पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर खाजगी गाड्यांसाठी खुले करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. पोलाद, लोह खनिज आणि वाहन या क्षेत्रातील कंपन्यांना आकर्षित करण्याचे रेल्वेचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.