दिवंगत गायक वाजिद खान यांच्या आईला ‘कोरोना’ची बाधा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – दिवंगत गायक वाजिद खान यांच्या आई रझिना यांना कोरोनाची बाधा झाल्याचा रिपोर्ट आला आहे. वाजिद खान यांचे काल मुंबईतील रुग्णालयात कार्डिअ‍ॅक अरेस्टने निधन झाले. रुग्णालयात दाखल केल्यापासून वाजिद यांची आई त्यांच्यासोबत होती.

वाजिद यांच्याआधीच त्यांच्या आईला कोरोनाची लागण झाली होती. किडनीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल केलेल्या वाजिदनंतर त्यांना कोरोना झाल्याचा रिपोर्ट आला होता. रझिना यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती समोर येत आहे.वाजिद यांचा मृत्यू कार्डिअ‍ॅक अरेस्टने झाल्याची माहिती साजिद खान यांनी दिली. त्याचसोबत नंतर त्यांचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले आहे. सोमवारी दुपारी वाजिद खान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे फक्त 20 जणांना अंत्यसंस्काराला जाण्याची परवानगी देण्यात आली होती.

पोलिसांच्या सुरक्षेत आणि निवडक कुटुंबीयांच्या उपस्थितीत वाजिद यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वाजिद खान यांच्या निधनावर कलाविश्वातून शोक व्यक्त करण्यात आला. अमिताभ बच्चन, सलमान खान, कतरिना कैफ, अक्षय कुमार, सोनम कपूर यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.