वाकड : सोसायट्यांचे पदाधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये महापौरांनी घडवून आणला ‘सुसंवाद’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – वाकड आणि पिंपळेनिलख भागातील गृहनिर्माण सोसायट्यांना जाणवणारी पाणी समस्या आणि विजेच्या प्रश्नासंदर्भात भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पुढाकारातून महापौर माई ढोरे यांनी रविवारी (दि. १) सोसायट्यांचे पदाधिकारी तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व महावितरणच्या अधिकाऱ्यांची वाकडमध्ये संयुक्त बैठक घेतली.

त्यामध्ये सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पाणी समस्या तसेच टँकरमाफियांकडून सोसायट्यांची कशा प्रकारे लूट सुरू आहे, याचा पाढा वाचला. महापौर माई ढोरे यांनी देखील अधिकाऱ्यांना धारेवर धरत पाणीप्रश्न सोडविण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी गृहनिर्माण सोसायट्यांचा पाणीप्रश्न येत्या दहा महिन्यांत कायमचा सोडविण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच सोसायट्यांच्या दहा प्रतिनिधींचा समावेश असलेल्या टिमसोबत सतत संपर्क आणि सुसंवाद ठेवून पाणीप्रश्नांवर मात करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

वाकड येथील हॉटेल अॅम्बियन्समधील हॉलमध्ये ही बैठक झाली. अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे होते. यावेळी स्थायी समितीच्या माजी सभापती ममता गायकवाड, नगरसेवक संदिप कस्पटे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, विद्यापीठ सिनेट सदस्य संतोष ढोरे, महावितरण मुख्य अभियंता सचिन तालेवार, महापालिका पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे, प्रवीण लडकत,

पिंपरी-चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे सुदेश राजे, सचिन लोंढे यांच्यासह वाकड आणि पिंपळेनिलखमधील विविध गृहनिर्माण सोसायट्यांचे चेअरमन, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

या बैठकीत गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पाणी समस्येबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या. सोसायट्यांना कधीच नियमित आणि उच्च दाबाने पुरेसे पाणी कधीच मिळत नसल्याचे सांगितले. महापालिका दुर्लक्ष करत असल्याने टँकरने पाणी आणावे लागते. त्याचा फायदा उठवून टँकरमाफिया डांगे चौक परिसरातील सोसायट्यांना एका टँकरमागे १५० रुपये आकारतात, तर वाकड आणि पिंपळेनिलख भागातील सोसायट्यांना टँकरमागे तब्बल ७५० रुपये आकारतात. हे टँकरमाफिया सोसायट्यांची आर्थिक लूट करत आहेत. ही आर्थिक लूट असह्य झाली आहे. पाणीगळतीमुळे सर्वांना समान पाणी देता येत नसल्याचे महापालिका कित्येक वर्षांपासून सांगत आहे. परंतु, ही पाणीगळती रोखण्यासाठी महापालिकेने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत, अशी नाराजी सोसायट्याचा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

सोसायट्यांच्या काही पदाधिकाऱ्यांनी आक्रमकपणे मुद्दे मांडले. त्यानंतर महापौर माई ढोरे यांनी पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे आणि प्रवीण लडकत यांना धारेवर धरले. कर भरणाऱ्या प्रत्येकाला पाणी देणे महापालिकेला बंधनकारक आहे. परंतु, महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग निष्क्रियपणे फक्त ऐकून घेण्याचे काम करत आहे. नागरिकांचा आक्रोश तुम्हाला ऐकायला येत नाही का?, सोसायट्यांना सुरळित पाणीपुरवठा करण्यासाठी का उपाययोजना केली जात नाही?, असा सवाल केला. आमदार लक्ष्मण जगताप यांनी टँकरमाफियांना शहरातून हद्दपार करण्यासाठी विहीरी व इतर नैसर्गिक स्त्रोत ताब्यात घेऊन ते पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. महापालिकेने सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून विहिरी व इतर नैसर्गिक स्त्रोतांचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्याची सूचना महापौर ढोरे यांनी केली.

त्याचप्रमाणे गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आमदार निधीतून रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था राबवून पाणी प्रश्न काही प्रमाणात सोडविता येईल, याकडेही महापौर ढोरे यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. सहशहर अभियंता रामदास तांबे आणि प्रवीण लडकत यांनी वाकड व पिंपळेनिलख भागातील सोसायट्यांचा पाणीपुरवठा येत्या दहा महिन्यांत सुरळित होईल, असे सांगितले. त्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि कामांची माहिती दिली. तसेच सोसायट्यांच्या दहा प्रतिनिधींचा समावेश असलेल्या टिमसोबत सतत संपर्क आणि सुसंवाद ठेवून पाणीप्रश्नांवर मात करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

त्याचप्रमाणे या बैठकीत सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सोसायट्यांमधील महावितरणचे डीपी, उघडे असणाऱ्या विजेच्या तारा, वारंवार जाणारी विज यांमुळेही नागरिक त्रस्त असल्याकडे महावितरणच्या अधिकाऱ्याचे लक्ष वेधले. एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता महावितरणने या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी उघडे डीपी, विजेच्या तारा झाकण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. तसेच आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आमदार फंडातील २५ लाख रुपयांचा निधीतून अन्य कामे सुरू असल्याचे सांगितले. वीजपुरवठा वारंवार खंडित होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन सोसायटी पदाधिकाऱ्यांना दिले

Visit : policenama.com