Wakad : पूर्ववैमनस्यातून तरुणांना टोळक्याकडून दगडाने बेदम मारहाण

वाकड/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सहा जणांच्या टोळक्याने दोन तरुणाला लाकडी दांडक्याने आणि दगडाने बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखम झाले आहेत. ही घटना रविवारी (दि.11) दुपारी साडेचारच्या सुमारास रहाटणी येथील गणराज कॉलनी येथे घडली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष संजय चव्हाण (वय-23), अक्षय कुंडलीक पाटील (वय-24 रा.गणराज कॉलनी, नखातेवस्ती, रहाटणी) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणांचे नाव असून अक्षय पाटील याने सोमवारी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अक्षय पाटील याच्या फीर्यादेवरुन पोलिसांनी सनी दहीभाते (रा. गणराज कॉलनी, रहाटणी), ओंकार तुपे (रा. जोतीबा कॉलनी, रहाटणी), निलेश पाटील, संकेत कदम, ओंकार माने, ऋषीकेश माने (सर्व रा. गणराज कॉलनी, रहाटणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फीर्यादी यांचा मावस भाऊ संजय चव्हाण यांच्यामध्ये पंधरा दिवसांपूर्वी भांडण झाले होते. रविवारी दुपारी अक्षय आणि त्याचा मावसभाऊ संतोष चव्हाण हे दोघेजण दूध आणण्यासाठी जात होते. त्यावेळी सनी दहीभाते आणि ओंकार तुपे या दोघांनी भांडणाचा राग मनात धरून संतोष चव्हाण याला लाकडी दांडक्याने आणि दगडाने मारहाण केली. तर इतर आरोपींनी अक्षय पाटील यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या आईवडिलांना शिवीगाळ केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अक्षय दाभाडे हे करीत आहेत.