दोन चोरट्यांकडून पाच लाखांचा ऐवज हस्तगत, वाकड पोलिसांची कामगिरी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांना अटक करुन त्यांच्याकडून चार लाख ८२ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. हि कामगिरी वाकड पोलिसांनी केली आहे. अरमान प्रल्हाद नानावत (२०, रा. पोटफोडेवस्ती, वडू खुर्द, ता. हवेली), धनराज शांतीलाल शेरावत (१९, रा. सराटेवस्ती, सणसवाडी, पुणे) या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस गस्त घालत असताना कस्पटेवस्ती चौक वाकड येथे एका मोटारसायकलवरून दोघेजण संशयितरित्या जाताना दिसले. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांना वाकड पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या आणखी मंगलसिंग बजरंग राजपूत (२०, रा. वढू बुद्रुक, आरगडे वस्ती, ता. शिरूर) या साथीदारासोबत मिळून चार सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले.

वाकड पोलिसांनी दोन चोरट्यांकडून १०५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, डॉमिनआर मोटारसायकल असा ऐवज हस्तगत केला. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील चार चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्रकुमार राजमाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश स्वामी, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी जावेद पठाण, प्रमोद भांडवलकर, विक्रम जगदाळे, रमेश गायकवाड, बापूसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, सुरेश भोसले, नितीन ढोरजे, शाम बाबा, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, प्रमोद कदम, दीपक भोसले, सचिन नरुटे, नितीन गेंगजे, सुरज सुतार, प्रशांत गिलबिले, तात्यासाहेब शिंदे यांच्या पथकाने केली.