अपहरण झालेल्या ‘त्या’ मुलाची सुखरूप सुटका ; वाकड पोलिसांना मोठे यश

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – पाच वर्षीय सुफियान खान याचे चार दिवसांपूर्वी दोन ओळखीच्या व्यक्तीने अपहरण केले होते. त्याची सुखरूप सुटका वाकड पोलिसांनी केली आहे. हे अपहरण दोन्ही आरोपीने कर्जबाजारी आणि लहान भावाच्या लग्नसाठी लागणाऱ्या पैश्यासाठी केल्याची कबुली दिली आहे. अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे. दोघांना ही वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. दरम्यान हे अपहरण नाट्य तब्बल चार दिवस चालले आहे.

मोहम्मद शकील सलीम खान वय-३२ रा.ईश्वर नगर विरार फाटा मुंबई मूळ उत्तर प्रदेश, शाहरुख मिराज खान वय-२६ रा.वाल्हेकरवाडी चिंचवड अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी वडील नासिर झाकीर खान यांनी पोलिसात तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाहरुख मिराज खान या आरोपींचे झम झम केटर्स आणि बिर्याणी हाऊस असून त्याच्याकडे मोहम्मद शकील हा कामासाठी होता. त्याच्या शेजारीच अपहरण झालेल्या मुलाचे म्हणजेच सुफियान याच्या आईचे लेडीज ब्युटी पार्लर हे शॉप आहे. त्यामुळे अपहरण झालेल्या पाच वर्षीय सुफियान ची ओळख ही शाहरुख याच्याशी होती त्यांच्यात जवळीक झाली होती. त्याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेल्या पंधरा वर्षांपासून खान कुटुंब राहण्यास आहे. परंतु गेल्या चार महिण्यापासून आरोपीने झम झम केटर्स आणि बिर्याणी हाऊस हे दुकान त्यांच्या शेजारी टाकले होते. आरोपी शाहरुख खान याला अनेक वेळा सुफियान च्या आईने आर्थिक मदत केली होती.आरोपीला आणखी पैसे हवे होते परंतु ते देण्यास सुफियान याच्या कुटुंबाने नकार दिला. खान कुटुंबाची आर्थिक परिस्थितीची जाण असल्याने त्यांच्या सुफियान या पाच वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचे शाहरुख याने ठरविले यात कर्मचारी मोहम्मद याला देखील सहभागी करून घेतले.

त्याप्रमाणे रविवारी दुपारी सुफीयान हा कुणाल सोसायटी इमारतीच्या पार्किंग मध्ये मित्रांसोबत खेळत असताना आरोपी शाहरुख हा दुचाकीवर आला आणि सुफीयानला घेऊन तो दुचाकीवरून पसार झाला. सुफीयान ओळखीचा असल्याने त्याला घेऊन जाण्यास जास्त वेळ लागला नाही. परंतु सुफीयान दिसत नसल्याने आई वडील घाबरले होते. त्यांनी शोध सुरू केला परंतु सुफीयान काही मिळत नव्हता. त्याच्या मित्राला विचारले केली असता त्याला कोणीतरी घेऊन गेल्याच सांगितलं. याप्रकरणी आई वडिलांनि वाकड पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली.

अपहरण केल्यानंतर मुलाला शिक्रापूर येथील लॉज वर घेऊन जाण्यात आले तर मोहम्मद शकील हा नेहमी काय घडामोड सुरू आहे याची माहिती घेण्यास तो दुकानी आला होता. सुफीयानला दिवसभर ते लोणावळा, वसई विरार ला घेऊन गेले होते. तब्बल दोन दिवसांनी सुफीयान च्या आईला शाहरुख चा फोन आला त्यात त्यांनी पाच लाख रुपयांची खंडणी मागत मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याप्रमाणे त्यांनी पैसे देण्यास होकार दिला आणि दिनांक ७ नोव्हेंम्बर रोजी चिंचवड येथील बस स्थानक येथे पाच लाख रुपये घेऊन येण्यास खान कुटुंबियांना संगीतले. याची माहिती वाकड पोलिसांना देण्यात आली. त्यांनी वेगवेगळ्या वेश धारण करून सापळा रचला आणि सुफीयानसह दोघाना अटक केली.

आरोपी शाहरुख च्या लहान भावाचे लग्न होते त्यासाठी त्याला पैसे हवे होते तसेच मोहम्मद शकील हा कर्जबाजारी झाला होता त्यामुळे तो देखील या कटकारस्थानात सहभागी होता. याप्रकरणी वाकड पोलीसचे ५ अधिकारी आणि ३० कर्मचारी तसेच गुन्हे शाखेचे ४ अधिकारी आणि २० कर्मचारी शोध घेत होते.अश्या ऐकून वाकड पोलिसांच्या ५ टीम तर गुन्हे शाखेच्या २ टीम मुलाचा शोध घेत होत्या. अखेर मुलाला सुखरूप सोडवण्यात वाकड पोलिसांना यश आले. त्यामुळे पोलिसांचे कौतुक खान कुटुंबीयांकडून होत आहे.