काय सांगता ! होय, ‘या’ हॉलिवूड स्टारच्या शेजारील बंगल्यांची किंमत आहे एवढी की वाचून व्हाल थक्क

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बेवर्ली हिल्स( Beverly Hills)  हे हॉलिवूडच्या (Hollywood) टॉप स्टार्सचं घर आहे. इथे अनेक मोठे स्टार्स राहतात आणि इथेच सिलवेस्टर स्टॅलन याचाही बंगला आहे. सिलवेस्टर स्टॅलनच्या शेजारी असलेल्या एका बंगल्याचा लिलाव होणार आहे. जो कुणी हा बंगला घेईल त्याला हॉलिवूड स्टारचा शेजारी होता येईल. तर हॉलिवूड अभिनेता सिलवेस्टर स्टॅलनच्या फॅन्सना त्याचा शेजारी होण्याची ही संधी आहे. पण, ही संधी मिळवण्यासाठी फॅन्सना त्यांचा खिसा चांगलाच रिकामा करावा लागणार आहे.

दरम्यान, इथे हॉलिवूडचे अनेक मोठे स्टार्स राहतात. इथे एखादा बंगला रिकामा असेल तर तो खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी स्पर्धा होते. तसं इथे घर घेण्याचं स्वप्न सर्वसामान्य व्यक्ती बघूही शकत नाही. येथील बंगल्यांवर लागणारी बोली ऐकून चक्रावून जातील. कारण, बेवर्ली हिल्समध्ये प्रॉपर्टीचे भाग आकाशाला भिडले आहेत.

एकूण ९ एकर परिसरात हा व्हिला तयार करण्यात आला आहे. त्यात एकूण १३ बेडरूम आणि २५ बाथरूम आहेत. या व्हिलाचा लिलाव होणार आहे. पार्टीला येणाऱ्या पाहुण्यांना इथे काहीही समस्या होणार नाही. कारण व्हिलामध्ये अनेक गेस्ट हाउस आहेत. हा व्हिला आर्किटेक्ट हेब्लिंस्कीने डिझाइन केला आहे. इथे पोहोचण्यासाठी प्रायव्हेट रस्ताही तयार केला आहे. इथे पार्टी करण्यासाठीही मोठी जागा आहे.

लिलाव करणाऱ्या कंपनीने सांगितले की, हा व्हिला केवळ घर नाही तर ऑथेंटिक इटालियन व्हिलेज आहे. यात स्वीमिंग पूल, जॉगिंग ट्रेल, पूल हाउस, जकूजी, टेनिस कोर्ट आणि ३० कार्ससाठी एक कोर्टयार्ड आहे. या व्हिलाची सुरूवातीची बोली १६० मिलियन अमेरिकन डॉलर (११७३ कोटी रूपये) इतकी ठेवण्यात आली आहे. ही या घराची किंमत आहे.