वाघोलीसाठी स्वतंत्र पोलिस स्टेशन व्हावे : आमदार अशोक पवार

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत असलेली लोणीकंद व लोणी काळभोर ही दोन मोठी पोलिस स्टेशन पुणे शहर पोलिस आयुक्तालयात सामाविष्ठ करण्याबाबत चर्चा सुरु असतानाच शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी दोन्हीही पोलिस स्टेशन आयुक्तालयात सामाविष्ठ करण्यास विरोध दर्शविला आहे. याबाबत पालकमंत्री अजित पवार व गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन, वरील दोन्ही पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत रहावीत तसेच वाघोलीसाठी स्वतंत्र पोलिस स्टेशन निर्माण करण्यात यावे यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली.

मागील भाजप सरकारने तीन वर्षापुर्वी पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस दलाच्या अखत्यारीत असणारी, लोणीकंद व लोणी काळभोर ही दोन मोठी पोलिस स्टेशन पुणे शहर आयुक्तालयात सामाविष्ठ करण्याचा निर्णय जाहीर केला होता. याबाबतचा आदेश होऊनही, काही तांत्रिक कारणामुळे वरील दोन्ही पोलिस स्टेशन शहर पोलिस दलात सामाविष्ठ होऊ शकली नव्हती. मात्र मागील दोन ते तीन दिवसांपासून शहर पोलिसांनी लोणिकंद व लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीत जाऊन, हद्दवाढीबाबत चाचपणी करण्यास सुरुवात केल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

याबाबत शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दोन्ही पोलिस स्टेशन पुणे शहर पोलिस आयुक्तालयात सामाविष्ठ करण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.तर लोणिकंद व लोणी काळभोर ही पुर्व हवेलीमधील दोन मोठी पोलिस स्टेशन आहेत. ही दोन्ही पोलिस स्टेशन शहर पोलिस आयुक्तालयात सामाविष्ठ करणे उचीत ठरणार नाही. पुर्व हवेली मधील लोकप्रतिनिधी व नागरीक ही शहर पोलिस आयुक्तालयात जाण्यात नाखूश आहेत.

यामुळे या भागाचा आमदार या नात्याने आयुक्तालयात सामाविष्ट करण्याचा निर्णयास माझाही विरोधच असणार आहे.त्यामुळे वरील दोन्ही पोलिस स्टेशन ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत रहावीत, तसेच वाघोली गावच्या लोकसंख्येचा विचार करता पुणे ग्रामीण पोलिसांकडून वाघोली साठी स्वतंत्र पोलिस स्टेशन निर्माण करावे यासाठी पुढील एक दोन दिवसात पालकमंत्री अजित पवार व गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेणार असून, त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे.