वक्फ बोर्डांनं PM आणि CM मदत निधीत दिले 51 कोटी, आयसोलेशन वॉर्डसाठी दिले 16 हज हाउस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी शनिवारी सांगितले की, कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षित १,५०० हून अधिक आरोग्य सहाय्यक कोविड-१९ च्या उपचारासाठी मदत करत आहेत. या व्यतिरिक्त देशभरातील १६ हज हाऊस क्वारंटाइन आणि आयसोलेशन केंद्र बनवण्यासाठी राज्य सरकारांना देण्यात आले आहेत. राज्य सरकार आवश्यकतेनुसार त्यांचा वापर करत आहे.

यावर्षी दोन हजारहून अधिक आरोग्य सहाय्यकांना प्रशिक्षण दिले जाईल
नकवी म्हणाले की, देशभरातील विविध रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांत कोरोना रूग्णांच्या उपचारात मदत करणाऱ्या आरोग्य सहाय्यकांमध्ये ५० टक्के मुली आहेत. यावर्षी मंत्रालयाकडून दोन हजारहून अधिक आरोग्य सहाय्यकांना प्रशिक्षण दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. मंत्रालय त्यांना विविध आरोग्य संस्था आणि प्रतिष्ठित रुग्णालयांच्या माध्यमातून एक वर्षाचे प्रशिक्षण प्रदान करते.

पीएम आणि सीएम मदतनिधीत ५१ कोटी रुपयांचे दान
नकवी म्हणाले की, देशभरातील विविध वक्फ बोर्डाने पीएम आणि सीएम मदतनिधीत ५१ कोटी रुपये दिले आहेत. याशिवाय विविध वक्फ बोर्ड गरजूंना अन्न व इतर आवश्यक वस्तूंचे वितरण करत आहेत. ते म्हणाले की, अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीने (एएमयू) पीएम केअर्स फंडमध्ये १.४ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. याशिवाय एएमयू मेडिकल कॉलेजने कोविड-१९ रुग्णांच्या उपचारासाठी शंभर बेडचीही व्यवस्था केली आहे.

देशात सतत वाढत आहेत कोरोना संक्रमित
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशात कोरोना संक्रमितांची संख्या साठ हजारांच्या जवळपास गेली आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत देशात एकूण कोरोना संक्रमित ५९६६२ झाले असून, १७८४७ लोकांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. कोरोनाच्या ऍक्टिव्ह केस ३९८३४ आहेत. तर देशात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत मृतांची संख्या १९८१ झाली आहे, जी आता दोन हजारच्या जवळपास पोचणार आहे.