देशानं पंतप्रधान केलं ; पण ‘काशी’च्या जनतेसाठी मी ‘कार्यकर्ता’च : नरेंद्र मोदी

काशी : वृत्तसंस्था – देशात भाजपप्रणीत आघाडीला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. आज काशी मधील एका सभेला नरेंद्र मोदींनी संबोधित केल. देशाने मला पंतप्रधान केले पण काशीतल्या लोकांसाठी मी कार्यकर्ता आहे. मी तुमचा आदेश मान्य केला, यापुढेही मी करेन असं म्हणत कार्यकर्त्यांचं समाधान हाच आमचा जीवनमंत्र आहे असं नरेंद्र मोदींनी म्हंटले आहे. काशीतल्या जनतेनी विश्वरूप दर्शन २५ एप्रिल रोजी देशाला घडवलं असून त्याचा प्रभाव देशावर राहिला. काशीतल्या जनतेनं दिलेल्या आशीर्वादामुळे मी विजयी झालो. मी आज काशीतून बोलत असलो तरीही पूर्ण उत्तर प्रदेश राज्याचं अभिनंदन करायचं आहे असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाच्या राजकारणाला नवी दिशा देणारं उत्तर प्रदेश राज्य ठरलं आहे. लोकशाहीला मजबूत करण्याचं काम उत्तर प्रदेशचे लोक करत असून याचा मला अभिमान वाटतो आहे. भारताच्या विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी उत्तर प्रदेशातील मतदार विचार करतो ही माझ्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. २०१४, २०१७ आणि २०१९ अशा तीन वेळेस विजयाची हॅट्रीक उत्तर प्रदेशाने दिली याचा खूप आनंद वाटत आहे असंही मोदींनी त्यांच्या भाषणात म्हटलं आहे.

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात यश मिळालं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्रचंड कष्ट घेतल्याने त्याचा परिणाम निवडणूक निकालांवर दिसून आला असंही मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान बोलत असताना जय श्रीराम आणि मोदी मोदी या घोषणाही देण्यात आल्या. वाराणसीच्या तमाम जनतेचे आणि मतदारांचे मोदींनी त्यांच्या भाषणात आभार मानले.