‘कोरोना’बाधित उपजिल्हाधिकार्‍यांची पत्नी, तीन मुलेही पॉझिटिव्ह !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – वर्धा जिल्ह्यातील कोरोनाबाधित उपजिल्हाधिकार्‍याची पत्नी आणि तीन मुलांनाही विषाणूची लागण झाली आहे. त्याचबरोबर पिपरी लग्न सोहळ्यातील एक जण आणि उत्तम गलवा येथील एका कर्मचार्‍यासह वाशीमचा एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. असे सात जण आज पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डावले यांनी माहिती दिली.

वर्धा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालल्याचे चित्र चिंताजनक आहे. धुळे येथून परतलेल्या उपजिल्हाधिकारी यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र ते डॉक्टरकडे भेट देण्यासाठी गेल्याने अन्य कोणाच्या संपर्कात आले, याबाबत माहिती घेणे सुरू झाले आहे.

तर दुसरीकडे काल एका लग्न सोहळ्यातील वर, वधू, मामाची मुले, वधूच्या मैत्रिणी पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आज एकजण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. या लग्नात बरीच गर्दी झाल्याची माहिती मिळाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे शहरात सध्या कडक संचारबंदी लागू आहे.