‘ही बाई बावळट’ ! हिंगणघाट जळीत प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांमध्ये ‘जुंपली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हिंगणघाट येथे प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्य पेटून उठले आहे. तरुणी सध्या नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. दरम्यान, दुसरीकडे या प्रकरणावरून भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली चाकणकर यांच्यात चांगलीच जुंपली आहे. रुपाली चाकणकर या बावळट आहेत, अश्या शब्दात चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.

भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी पीडित तरुणीला सरकार मदत न करत असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या या आरोपाला प्रतिउत्तर दिले आहे. भाजपची सत्ता गेल्याने चित्र वाघ हताश झाल्याने त्या विनाकारण आरोप करत असल्याचं चाकणकर यांनी यावेळी म्हंटल आहे.

चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र राज्यात महिला अत्याचाराच्या दुर्दैवी घटना घडत आहे. राज्य सरकार या घटना रोखण्यासाठी अपयशी ठरले असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. पीडित मुलीला सरकारकडून एकही रुपया दिला नाही. रुग्णालयात पीडित मुलीच्या आई वडिलांकडून पैसे मागितले जात आहे, असा आरोपही चित्रा वाघ यांनी केला. तर सरकारकडून मुलीचा खर्च होत नसेल तर भाजप हा खर्च उचलणार असंही त्यांनी सांगितलं.

चाकणकर यांचा पलटवार

रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर देताना म्हंटल कि, गृहमंत्र्यांनी रुग्णालय प्रशासनाला उपचारासाठी ४ लाखाची मदत दिली आहे, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणाचं राजकारण करत असल्याची टीका चाकणकर यांनी केली. तसंच, ऑरेंज सिटी रुग्णालयाची डायरेक्टर डॉ.अनुप मराल यांनी सुद्धा हॉस्पिटलला चार लाख रुपयाची मिळाल्याची कबुली दिली असून कुटुंबाकडून कोणताही पैसा घेतला जाणार नसल्याचं चाकणकर त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

रुपाली चाकणकर बावळट : चित्रा वाघ

चाकणकर यांच्या वक्तव्यांनंतर चित्रा वाघ यांना राग अनावर झाला. चाकणकर ही बाई बावळट आहे, तुम्हाला छापायचं असेल तर खुशाल छापा, असं सांगत चित्रा वाघ यांनी जोरदार हल्लाबोल केला. तसंच, ऑरेंज सिटी रुग्णालयात पीडितेला 11 वाजून चार मिनिटांपर्यंत पीडितेच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते. त्यानंतर 10 मिनिटांनी पैसे जमा झालेत. या प्रकरणी दोन दिवसांपासून सरकार घोषणा करत आहे. लाज नाही वाटत काय खोटं बोलायला. सरकारचा हा खोटारडेपणा होता, तो जनतेपुढं आणणार, असल्याचंही वाघ म्हणाल्या.