मोदींच्या वर्ध्यातील सभेचे मैदान अर्धे रिकामेच

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रचार वर्ध्यातून सुरु केला. वर्ध्यातील स्वावलंबी मैदानात मोदींची सभा झाली. २०१४ मध्येही वर्ध्यातूनच सुरुवात केली होती. परंतु भाजपसाठी लकी ठरलेल्या वर्ध्यातील सभेवेळी मात्र अपेक्षेपेक्षाही कमी जनसमुदाय आल्याने अर्धे मैदान रिकामे दिसले.

देशात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक पक्ष शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात भाजपकडूनही राज्यात याची सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आज वर्ध्यात भाजपच्या महाराष्ट्रातील प्रचाराला सुरुवात झाली. सभेच्या आधी नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली. २०१४ साली देखील भाजपने वर्ध्यातूनच आपल्या लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात केली होती.

भाजपसाठी साडेअकराच्या सुमारास संपन्न झालेल्या या सभेला आयोजकांना गर्दी अपेक्षित होती. त्यामुळे या १८ एकराच्या मैदानाची निवड करण्यात आली होती. मात्र या मैदानाचा अर्ध्यापेक्षा अधिक भाग रिकामा होता. आयोजकांना अपेक्षित गर्दी मोदींच्या सभेला नव्हती. त्यासोबतच रणरणते उन्ह असल्याने गर्दी कमी झाली अशी चर्चा आहे. पन्नास हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, यातील अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. याचे फोटो व्हायरल झाले आहेत.