हातात दंडुका नसला तरी वर्दीचा अपमान सहन करणार नाही – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबई : पोलीसनाम ऑनलाइन –  महाराष्ट्रात कोरोना विषाणू अधिकच पसरत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे. तरीही बाजारात, रस्त्यावर लोकांची वर्दळ दिसत आहे. अनेक ठिकाणी नियमाला पायदळी तुडवलं जात असल्याचे चित्र समोर येत आहे. या निर्बधात जनतेशी सभ्य भाषेत सवांद साधा आणि शक्य करून दंडुकाचा वापर करू नका असाही आदेश देण्यात आले. या कारणामुळे काही लोक संयमी वर्तणुकीचा गैरफायदा घेत पोलिसांची हुज्जत घालत आहेत. या प्रकारावरून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एक इशारा दिला आहे, हातात दंडुका नसला तरी वर्दीचा अपमान सहन केला जाणार नाही’, असे त्यांनी म्हटले आहे.

गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, यंदाच्या कडक निर्बधात राज्यातील पोलिसांना संयमी राहण्याचे आदेश त्या त्या विभागातील प्रमुखांकडून देण्यात आले आहेत. लोक सध्या लॉकडाउनच्या मानसिकतेत नसून काही अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडलेले असू शकतात. त्यामुळे त्यांच्यावर थेट दंडुका वापरणं बरोबर ठरणार नाही. मात्र अनेक ठिकाणी लोक काहीही काम नसताना विनाकारण फिरताना दिसतात. पोलिसांनी सभ्य भाषेत समजावल्यावर उलट त्यांच्यावरच आवाज चढवण्याच्या काही घटना घडत आहेत. अशा नागरिकांना मी सांगू इच्छितो की पोलिसांच्या हातात दंडुका नाहीत म्हणून त्यांचा अपमान करू नका. वर्दीचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही, अशा इशाराच गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिला आहे. तसेच या लावलेल्या निर्बधात अत्यावश्यक सेवा आणि आस्थापनांना सवलत दिली आहे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडता येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. येथे मास्क न लावल्यामुळे पोलिसांना एका नागरिकाला फटकारलं असता, त्या व्यक्तीने थेट पोलिसालाच शिवीगाळ केल्याचीही घटना प्रकार घडला आहे.

पुढे गृहमंत्री म्हणाले, कोरोनाच्या अशा परिस्थितीत ज्या ठिकाणी नियम मोडले जातील त्यांच्यावर जागीच कारवाई केली जाणार आहे. पोलिसांना आणि प्रशासनाला तसे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे माझी नागरिकांना विनंती आहे, की कोरोनाची भयावह साखळी तोडण्यासाठी कृपया साऱ्यांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका. अतिशय महत्त्वाचं किंवा वैद्यकीय काम असल्यास तुमची गैरसोय होणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे मात्र जर नियम मोडणारे कोणी आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिला आहे.