कोकण – मराठवाडयात अतिवृष्टीचा इशारा

पोलीसनामा ऑनलाईन टीम : पोषक हवामानाच्या स्थितीमुळे नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांची प्रगती महाराष्ट्रात सध्या वेगाने होत आहे. निम्म्याहून अधिक राज्य मोसमी वार्‍यांनी व्यापले असून, रविवापर्यंत ते कोकणातील बहुतांश भागास मुंबई व्यापतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस ते अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

राज्यात प्रवेश केल्यानंतर दोनच दिवसांमध्ये मोसमी वार्‍यांनी निम्म्याहून अधिक भाग व्यापला आहे. शनिवारी मोसमी वार्‍यांनी मध्य महाराष्ट्रात आणखी काही भागात प्रगती केली. ते नगपर्यंत दाखल झाले आहेत. मराठवाडयात औरंगाबादपर्यंत त्यांनी मजल मारली. रविवापर्यंत कोकणातील उर्वरित भाग आणि मुंबईपर्यंत मोसमी वारे पोहोचण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यात मोसमी वार्‍यांचा प्रवेश झाला असून, रविवारी ते शहर व्यापून पुढे प्रगती करतील, असा अंदाज आहे. विदर्भात शनिवारी अकोला वगळता कुठेच पाऊस झाला नाही. गेल्या तीन चार दिवसांपासून विदर्भातील विविध जिल्ह्यांत ढगाळ वातावरण आहे. शनिवारी मात्र अकोला वगळता यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती, गोंदिया, भंडारा आणि नागपूर व जिल्ह्यात पावसाचा पत्ता नव्हता. रत्नागिरी, जालना, परभणी, नांदेड, हिगोली, नाशिक, धुळे, नागपूर, जळगाव, औरंगाबाद या भागांसह मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत पाऊस होत आहे.