…अन्यथा मराठा समाजाचे आंदोलन ‘मातोश्री’वर नेऊ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी मुंबईत मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की महाविकास आघाडीच्या सरकारने मराठा आरक्षण कायद्याची अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय द्यावा. तसे न झाल्यास मराठा समाजाचे आंदोलन ‘मातोश्री’ वर कसे घेऊन जायचे हे आम्हाला चांगलेच माहिती आहे असा इशारा ही त्यांनी दिला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सकाळी आझाद मैदानात आंदोलकांशी चर्चा केली. तसेच त्या म्हणाल्या की, मंत्रालयात याबाबत सामान्य प्रशासन विभागाबरोबर बैठक घेऊ असे आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले. या आंदोलनाचा सोमवारी सातवा दिवस होता.

मराठा समाजातीळ एसईबीसी आणि ईएसबीसी उमेदवारांनी २८ जानेवारीपासून आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनातील मुद्दे म्हणजे मराठा समाजास महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६२ मधील कलम १८ अन्वये काढण्यात शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी. तसेच २०१४ च्या भरती प्रक्रियेमधील उमेदवारांना तत्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात अशा काही मागण्या होत्या. रविवारी या आंदोलनाला तब्बल सहा दिवस झाले तरीही सरकारने दखल घेतली नसल्याने आंदोलनकर्त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा सरकारला दिला.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली त्यावेळी आंदोलकांनी त्यांना सांगितले की मराठा समाजाबद्दल सरकारी अधिकारी कसा दुजाभाव करतात आणि तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारने मागील पाच वर्षांत आश्वासन देण्यापलीकडे काहीच केले नाही असा आरोप देखील तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारवर आंदोलकांनी केला.