… तर एसटी कर्मचार्‍यांवर होणार निलंबनाची कारवाई

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनामुळे एसटी महामंडळ अत्यावश्यक सेवेतील चालक, वाहकासह अन्य कर्मचारी गैरहजर राहात आहेत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा एसटी महामंडळाकडून देण्यात आला आहे. याबाबतचे पत्र मुंबई, ठाणे, पालघर विभाग नियंत्रकांना पाठवण्यात आले आहे.

वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, पालिका कर्मचारी, शासकीय कर्मचारी, अग्निशमन दल कर्मचारी इत्यादींसाठी एसटी महामंडळ अत्यावश्यक सेवा देत आहेत. यासाठी मुंबई, ठाणे, पालघर भागात एसटी चालवण्यात येतात. टाळेबंदीपासून या वाहतुकीचा आढावा एसटी महामंडळाने घेतला असता नियोजनापेक्षा फक्त 30 टक्के वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. याविषयी एसटी महामडळांत वाहतूक विभागाची बैठक घेण्यात आली.

या बैठकीनंतर चालक, वाहक, पर्यवेक्षक व अन्य कर्मचार्‍यांसाठी आदेश काढण्यात आले. कामावर गैरहजर राहणार्‍या कर्मचार्‍यांना तातडीने कर्तव्यावर हजर होण्याबाबत लेखी आदेश देण्याचे विभाग नियंत्रकांनाही सांगितले. जे कर्मचारी कर्तव्यावर येणार नाहीत, त्यांना गैरहजेरीच्या कालावधीचे वेतन मिळणा नसल्याचे काढलेल्या आदेशातून स्पष्ट केले आहे. तर जे कर्मचारी कर्तव्यावर येणार नाहीत किंवा टाळाटाळ करतील, अशांवर निलंबनाचीही कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर विभागांतील सर्व चालक व वाहकांनी कामावर हजर राहणे, वाहतूक नियंत्रकांनी रोजच्या वाहतुकीचा आढावा घेणे, याशिवाय कामावर येणार्‍या कर्मचार्‍यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही उपाय करण्याचे विभाग नियंत्रकांना सुचविले आहे. कर्मचार्‍यांना मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करावे, त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करावी, असे आदेशात म्हटले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like