भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला होणार अटक

दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरच्या अटकेचे आदेश दिल्लीच्या साकेत न्यायालयाने दिले आहे. गौतम गंभीर हा रुद्रा बिल्डवेल रिअ‍ॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या रिअल इस्टेट कंपनीचा ब्रँडअ‍ॅम्बेसिडर आहे.
या कंपनीचे व्यवस्थापक मुकेश खुराना आणि एचआर एफ्रासिटी प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष गौतम मेहता यांच्यावर फसवणूक, गैरव्यवहार आणि गुंतवणुक दारांचे  पैसे लुबाडण्याचा आरोप आहे. ब्रँड अ‍ॅम्बेसिडर असल्याने गंभीरही या कारणामुळे अडचणीत सापडला आहे.
या संबंधी १७ लोकांनी तक्रार दिली आहे त्यांनी २०११ मध्ये गाजियाबाद येथे इंदापूरम या प्रोजेक्ट मध्ये फ्लॅट बुकिंग करून १. ९८ कोटी रुपये दिले होते, मात्र या प्रोजक्टचं काम सुरूच झालं नाही. २०१६ मध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. रुद्रा ग्रुपने गंभीरच्या नावाखाली गुंतवणुकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळले. म्हणून या कंपनीवर फसवणूकीच्या तक्रारी दाखल झाल्या. या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याची गंभीरने दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. साकेत न्यायालयाचे न्यायाधीश मनिष खुराणा यांनी गंभीरच्या अटकेचे आदेश दिले. याचिका फेटाळूनही गंभीर न्यायालयात सुनावणीच्या वेळी हजर न राहिल्याने हे आदेश देण्यात आले. २४ जानेवारी रोजी या प्रकऱणाची पुढील सुनावणी होणार आहे.
गौतम गंभीरने नुकतीच क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती स्वीकारलीये. त्याने ५८ कसोटीत ४१५४ धावा, १४७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५२३८ धावा आणि ३७ ट्वेंटी-२० सामन्यात ९३२ धावा केल्यात.तसेच भारताला २००७ चा ट्वेंटी २० आणि २०११ चा वन डे विश्वचषक जिंकून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता.