माझ्यावर कोणीतरी सतत लक्ष ठेवून आहे का ?, आनंद महिंद्रांना ‘संशय’

पोलिसनामा ऑनलाईन – व्हॉट्सअ‍ॅपवर येणार्‍या फोटोंपासून सुविचारांपर्यंत महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा हे चांगलेच अ‍ॅक्टीव्ह आहेत. त्यांनी केलेले ट्विट व्हायरल होतात. कोरोना लॉकडाउनच्या काळात वर्क फ्रॉम होमदरम्यान आनंद महिंद्रा घरातील कपड्यांमध्येच काम करतात का असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. सध्या त्यांनी पोस्ट केलेल्या एका मजेदार फोटोवर ही चर्चा रंगली आहे.

आनंद महिंद्रांनी एका लुंगीच्या जाहिरातीच्या होर्डिंगचा फोटो पोस्ट केला आहे. या होर्डिंगमध्ये एका लुंगीच्या ब्रॅण्डची जाहिरात करण्यात आली आहे. होर्डींगवर एक पुरुष लुंगी घालून उभा आहे. केरळातील अधिकृत वर्क फ्रॉम होम ड्रेस अशी ओळ या होर्डिंगवर लिहिलेली आहे. फॉर्मल शर्ट आणि लुंगी घातलेल्या व्यक्तीचे हे होर्डिंग केरळमधील नक्की कोणत्या शहरात लावण्यात आले आहे याबद्दलची माहिती मिळालेली नाही. मात्र आनंद महिंद्रा यांनी याच होर्डिंगचा फोटो पोस्ट करत माझ्यावर कोणी नजर ठेवतय का असा प्रश्न उपस्थित केला आहे. कोणी माझी रेकी करत होते का?, अशा कॅप्शनसहीत महिंद्रांनी हा फोटो ट्विट केला आहे. या फोटोला 21 हजारहून अधिक जणांनी लाइक केले आहे. यापूर्वीही आनंद महिंद्रांनी वर्क फ्रॉम होमदरम्यान काम करणार्‍यांचा अवतार कसा असतो याबद्दल ट्विट केले होते.