UPA सरकार ‘सियाचीन’ला पाकिस्तानच्या स्वाधीन करणार होतं ? माजी सैन्यप्रमुखांनी केला मोठा ‘खुलासा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   काँग्रेस पक्षावर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी एका मुलाखतीत असा आरोप केला आहे की युपीएच्या नेृत्वाखालील सरकार 2006 साली सियाचिनला पाकिस्तानला सुपूर्द करणार होती. आता याबाबतीत माजी आर्मी चीफ जनरल जे. जे. सिंह यांनी विधान केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की सियाचिनवरील लष्करी ताबा हटवून त्याला शांती पर्वत घोषित करायची योजना ही युपीए सरकारची होती. मात्र याला आम्ही तीव्र विरोध केला, असं स्पष्ट केलं. जे.जे. सिंह यांनी सियाचिन पर्वतवरुन त्या वेळी असणाऱ्या युपीए सरकारच्या योजनेचा दुसरा पैलू समोर ठेवला असला तरी यावरुन मोठा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की सियाचीनमधून भारतीय सैन्य काढून टाकण्याचा पहिला प्रस्ताव 1989 मध्ये मांडण्यात आला होता. त्यावेळी पर्वताला शांती पर्वत घोषित करण्याच्या योजनेवर चर्चा झाली. मात्र, यासंदर्भात पाकिस्तानकडून कोणतीही मंजुरी मिळालेली नाही.

दरम्यान, यानंतर जनरल जे.जे. सिंह यांनी गंभीर माहिती दिली. ते म्हणाले की सियाचीन येथून 1989 मध्ये प्रथम सैन्य उठाव करण्याचे नियोजन होते. त्यानंतर 2006 मध्ये मी जेव्हा लष्करप्रमुख म्हणून सेवा बजावत होतो तेव्हादेखील यावर प्रश्न विचारण्यात आला होता. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग स्वत: सियाचीन येथे आले होते आणि मी त्यांना या पर्वतावर भारतीय सैन्याचे नियंत्रण महत्वाचे असल्याचे सांगितले होते. जर यास ‘शांती पर्वत’ घोषित करायचा असेल तर प्रथम पाकिस्तानला त्यांचे सैन्य ताबा असलेली ठिकाणे जाहीर करावे लागेल, असेही सुचवले असल्याचे त्यांनी मुलाखती दरम्यान सांगितले. जेव्हा पाकिस्तानने त्यांचा ताबा असलेल्या ठिकाणांचा खुलासा करण्याबाबत आक्षेप घेतला आणि हा प्रस्ताव मंजूर करण्यास नकार दिला तेव्हा हा प्रस्ताव रद्द करण्यात आला.

भाजपाचा आरोप काय?

भारतीय सैन्याने विरोध केला नसता तर यूपीए सरकारने सियाचीन पाकिस्तानच्या स्वाधीन केले असते, असा दावा भाजपाने केला आहे. याचा पाकिस्तानला तसेच चीनलाही फायदा झाला असता असेही भाजपाने म्हटले आहे. नेहरू-वाड्रा कुटुंबाला याचा कसा फायदा होईल असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. प्रॉपर्टी डीलर म्हणून भारताची जमीन पाकिस्तान आणि चीनमध्ये विभागून किती पैसे मिळवले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.