वाशिम : 11 नीलगायींचा विहिरीत बुडून मृत्यू; वन्यजीव प्रेमींकडून हळहळ

वाशिम : पोलीसनामा ऑनलाइन –   पाण्याच्या शोधात भटकणा-या 11 नीलगायींचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. वाशिम जिल्ह्यातील वरदरी (ता. मालेगाव) येथील काटेपूर्णा अभयारण्याच्या परिसरात गुरुवारी (दि. 8) सकाळी ही घटना उघडकीस आली. रात्री उशिरा सर्व नीलगायींचे मृतदेह जेसीबीच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. जागतिक जलसंधारण दिनाच्या पूर्वसंध्येला अशी दुर्दैवी घटना समोर आल्याने वन्यजीव प्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबतची माहिती अशी की, वरदरी गावातील एक व्यक्ती सरपण वेचण्यासाठी काटेपूर्णा अभयारण्यात गेला होता. विहिरीजवळ गेला असता त्याला विहिरीत नीलगायींचे मृतदेह तरंगताना दिसले. त्याने तातडीने या घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली. अभयारण्याच्या हा परिसर असल्याने या भागात नीलगायी, बिबटे व इतर वन्य प्राण्याचा नेहमीच वावर असतो. ज्या विहिरीत हा 11 नीलगायींचा कळप पडला होता. त्या विहिरीला संरक्षक कठडा नाही. ही विहीर जमिनीशी समांतर आहे. त्यामुळेच पाण्याच्या शोधात एकाच ठिकाणी आलेल्या नीलगायी विहिरीत पडल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर रात्री उशिरापर्यंत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत नीलगायींना जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढले. नंतर शासकीय नियमांनुसार पंचनामा करून मृतदेहची विल्हेवाट लावण्यात आली.