दुर्दैवी ! सुनेला वाचवण्याच्या प्रयत्नात सासूचाही पाण्यात बुडून मृत्यू

वाशिम : पोलीसनामा ऑनलाईन – तलावात बुडणाऱ्या सुनेला वाचवताना सासूचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोमवारी (दि. 29) दुपारी कोळी (जि. वाशिम) येथे ही घटना घडली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जयंताबाई बुडके आणि शीतल बुडके अशी मृत्यू पावलेल्या सासू- सुनेची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी वीटभट्टीची सर्व कामे आटोपून शीतल बुटके आणि तिची सासू जयंताबाई बुटके दोघीही कपडे धुण्यासाठी तलावावर गेल्या होत्या. कपडे धूताना शीतलचा पाय घसरून ती पाण्यात पडली. ती पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच सासूने सुनेचा हात धरून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जयंताबाईचाही पाय घसरला अन् त्याही पाण्यात बुडू लागल्या. या दोघी बुडत असल्याचे त्यांच्या मुलाला दिसले. त्याने दोघींना वाचविण्याचा प्रयत्न केला. पोहता येत नसल्यामुळे त्याने आरडाओरड केला. त्यावेळी गावातील काही तरुणांनी तिथे धाव घेऊन जयंताबाईला पाण्यातून बाहेर काढले. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. तर शीतलचा शोध लागला नव्हता. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पाण्यात बुडालेल्या शीतलचा मृतदेह गळ लावून बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी कारंजा शहर पोलिसानी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.