‘मला नोकरी द्या अन्यथा पोरगी पाहून लग्न करून द्या’, वाशिमच्या युवकाचं थेट CM ठाकरेंना पत्र, सोशल मिडियावर जोरदार चर्चा

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – वाशिममधील एका तरूणाने चक्क मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवून एकतर मला नोकरी द्या नाहीतर पोरगी पाहून माझ लग्न करून द्या अशी अनोखी मागणी केली आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याआधीही अनेकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या व्यथा कळवल्या होत्या, यात लहानग्या चिमुकल्यांनीही लिहिलेली पत्र भावनात्मक होती.

गजानन राठोड असे या तरुणाचे नाव असून तो वाशिम येथील राहणारा आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात त्याने म्हटले आहे की, माझ वय 35 वर्ष असून माझे लग्न झालेले नाही. त्याचं कारण गेल्या 7 वर्षापासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, परंतु कमी गुणांमुळे मला नोकरी मिळाली नाही, जिथे मुलगी बघायला जातो, तिथे मुलाला नोकरी असावी ही अट असते. तुम्ही आतापर्यंत नोकरीच्या जागा काढल्या नाहीत, त्यामुळे जॉब मिळणेही कठीण झाले आहे, त्यामुळे मला एकतर जॉब द्यावा अन्यथा माझे एखाद्या मुलीशी लग्न करून द्यावे अशी अजब मागणी गजानन राठोडने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केली आहे.

बीडमधील एका तरूणाने मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा अशी मागणी करणार पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना दोन वर्षापूर्वी लिहिले होते. मराठवाड्याचे प्रश्न सोडवण्यासाठी या तरूणाने ही मागणी केली होती, तसेच त्याच्या मूळ गावापासून लालबागच्या राजापर्यंत दंडवत घालत पायी यात्राही काढली होती. हा तरूणही त्यावेळी जोरदार चर्चेत आला होता, आता वाशिमच्या युवकाने केलेल्या मागणीही जोरदार व्हायरल होत आहे.