‘1 वर्ष झालं नाही क्रिकेट खेळून अन् मला आव्हान देतोय’ ! रोहितकडून ऋषभ पंत ‘ट्रोल’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरातील क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडूही या काळात घरामध्ये राहत परिवारासोबत वेळ घालवताना दिसत आहेत. मात्र या काळातही भारतीय खेळाडू आपल्या सहकार्‍यांशी, चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधत क्रिकेटचा माहोल कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार्‍या रोहित शर्माने टीम इंडियाचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतला खास शैलीत ट्रोल केले आहे.

रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह ही मुंबई इंडियन्सची जोडगोळी सोशल मीडियावर लाईव्ह चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत होती. यादरम्यान ऋषभ पंतने रोहित शर्माला सर्वात लांब षटकार कोण मारते असे आव्हान दिले. पंतच्या या आव्हानाला रोहितनेही आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर देत एक वर्षच झाल तू किृकेट खेळतोय असे म्हणत पंतची बोलती बंद केली आहे.

रोहित शर्माचे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 29 मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा बीसीसीआयने 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र देशात कोरोनामुळे सध्याची परिस्थिती पाहता 15 एप्रिलपासून आयपीएल सुरु होईल की नाही याबद्दल साशंकता आहे. दरम्यान बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या कार्यकाळात आयपीएल खेळवण्याचा विचार आहे. मात्र यासाठी बीसीसीआयला आयसीसीच्या दरबारी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.