पोलिसांसाठी आता वॉटर बेल; परिमंडळ तीनमध्ये उपक्रम

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उभा राहुन गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या आरोग्यासाठी वॉटर बेलचा उपक्रम सुरू केला असून, परिमंडळ तीनमधील 17 ठिकाणी असणाऱ्या नाकाबंदी येथे उपक्रम राबविला जात आहे. प्रत्येक तासाला घंटानाद होईल. त्यावेळी नाकाबंदी करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी हात स्वच्छ धुणे, भरपूर पाणी पिणार आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. तर शहरात वाहन बंदी केली आहे. पोलीस पहिल्या दिवसापासून पोलीस रस्त्यावर उभे आहेत. नाकाबंदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलिस अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. दिवसभरात हजारो लोकांसोबत पोलिसांचा

संपर्क येतो. अश्यावेळी पोलिसांच्या आरोग्यास धोका तर निर्माण होतो. तर त्यांनी निरोगी राहणे तसेच कर्तव्ये पार पाडणे महत्वाचे आहे.

ही बाब लक्षात परिमंडळ तीनच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना नाकाबंदी बंदोबस्त करताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी “वॉटर बेल” हा उपक्रम सुरू केला.

त्याद्वारे नाकाबंदी ठिकाणावर असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देण्यासाठी दर एक तासाने घंटानाद करतो. त्यानंतर तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी तत्काळ आपले हात सॅनिटायझरने हात स्वच्छ करून घेतात. त्यानंतर तेथे उपलब्ध करून दिलेल्या पोर्टेबल बेसीन मध्ये पुन्हा साबणाने हात धुवून पाणी पिण्यास प्राधान्य दिले जात आहे.

परिमंडळ तीनच्या हद्दीत येणाऱ्या १७ नाकाबंदी केंद्रावर “वॉटर बेल” सुरू करण्यात आली आहे. त्यांनंतर दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांनीही त्यांच्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नाकाबंदी ठिकाणावर ही सुविधा सुरू केली आहे. दरम्यान शहरातील बहुतांश ठिकाणी पोलिसांना कामामुळे जेवण, पाणी व विश्रांती करण्यास वेळ मिळत नसल्याची सद्यस्थिती आहे. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.