पाणी मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांचा पाटबंधारे कार्यालयात राडा

सांगलीः पोलीसनामा आॅनलाईन

म्हैसाळ उपसा सिंचन योजना गेल्या महिन्यापासून सुरु झाली. मात्र मिरज तालुक्यातील मालगाव येथे पाणी मिळत नसल्यामुळे येथील शेतकरी शनिवारी चांगलेच आक्रमक झाले. यावेळी पाटबंधारे म्हैसमाळ योजनेच्या कार्यलयात शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. शेतकरी व अधिकारी यांच्यात जोरात वादावादी झाली. तसेच संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयातील फायली व कागदपत्रे भिरकावली. जानेवारीपासून विविध संघटनांनी व पक्षांनी म्हैसाळ सिंचन योजना सुरू व्हावी म्हणून आंदोलने केली होती. मात्र थकबाकी असल्यामुळे ही योजना सुरू करण्यात अडचणी होत्या. त्यानंतर खासदार संजय पाटील व जिल्ह्यातील इतर आमदारांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून अखेर कृष्णा खोरे महामंडळाकडून पाणीपट्टीतून रक्कम उधार घेऊन मार्च महिन्यात योजना सुरू केली.

मालगाव भागात प्रथम पाणी देण्यात यावे या मागणीसाठी शनिवारी दुपारी मालगाव परिसरातील सुमारे पन्नास ते साठ शेतकरी ताकारी म्हैसाळ सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता एस. एम. नलवडे यांना भेटले. यावेळी शेतकऱ्यांनी तात्काळ पाणी देण्याची मागणी केली. मात्र यावर तांत्रिक अडचण सांगत नलवडे म्हणाले काही दिवस लागतील. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यानी जोर-जोरात घोषणाबाजी करीत नलावडे यांच्या सोबत वाद घातला. तरसेच काहींनी नलवडे यांच्या दालनातील फायली भिरकावत पाटबंधारे प्रशासनाचा निषेध केला. याप्रकरणी पाटबंधारे विभागाकडून कोणतीही तक्रार आली नसल्याचे संजयनगरचे पोलीस निरीक्षक भिंगारदेवे यांनी सांगितले.