‘गोदावरी’ला महापूर ! त्र्यंबकेश्वर मंदिरात पाणी शिरले, कालवा फुटला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – त्र्यंबकेश्वरच्या पर्वतावर रात्रभर पडत असलेल्या पावसाने त्र्यंबकेश्वर मंदिरात पाणी शिरले असून सर्वत्र पाणीच पाणी दिसत असून मंदिराच्या पायऱ्यांवरुन मोठ्या प्रमाणावर पाणी ओसंडून वाहताना दिसत आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीला महापूर आला असून शहराच्या अनेक भागात पाणी शिरले आहे. गंगापूर धरण ९० टक्के भरले असून धरणातून सध्या ३६ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नाशिक जिल्ह्यातील वाघाड कालवा फुटला असून त्यामुळे महामार्गावरील पुल पाण्याखाली गेला आहे. नाशिक पुणे महामार्गावर प्रथमच पाणी आले आहे.

होळकर पुलाखालून पाण्याचा विसर्ग ७० हजार क्युसेसपेक्षा अधिक आहे. नारोशंकर मंदिराचे संपूर्ण छत पुराच्या पाण्यात बुडाले आहे. मंदिराच्या घंटेपर्यंत पाणी पोहचले आहे. महापूराचा संकेत देणाऱ्या मंदिराच्या घंटेला पाणी लागले आहे. त्र्यंबकेश्वर येथे तब्बल साडेतीनशे मिमी पावसाची नोंद झाली आहे.

गाडगे महाराज पुलाच्या खाली पाणी लागले आहे. सकाळी १० वाजेपर्यंत गोदाकाठलगतची सर्व मंदिरे पाण्याखाली गेली असून शहरातील बालाजी कोट, कापड बाजार, सराफ बाजार, भांडी बाजार जलमय झाला आहे. घारपूरे घाटपुलावरुन देखील पाणी वाहण्याची शक्यता असल्याने या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

नदी काठच्या लोकांनी सुरक्षित जागी जावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. नाशिककरांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पेठ तालुक्यात २०० मिमी पाऊस
पेठ तालुक्यात गेल्या २४ तासात तब्बल २०० मिमी पावसाची नोंद झाली असून संगमेश्वर नदीला पूर आला असून शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. पेठ ते जोगमोडी थेट सुरगाणा तालुक्यास जोडणारा रस्ता संगमेश्वर मंदिराजवळील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.

कसारा इगतपुरी रेल्वे व रस्ता वाहतूक पूर्ण पणे बंद झाली आहे. कसारा, मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकात लोहमार्गावर पाणी साचल्याने इगतपुरी रेल्वे स्थानकात पहाटे चार वाजल्यापासून गाड्या जागच्या जागी उभ्या आहेत. तीन ते चार तास अनेक गाड्या एकाच जागी उभ्या असल्या तरी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची खानपानची व्यवस्था केलेली नाही. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे- मनमाड- भुसावळ ही एक्सप्रेस मनमाड, दौंडमार्गे वळविण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –