‘पिंपरी-चिंचवड’साठी पिण्याच्या पाण्याचे पुढील ५० वर्षांचे नियोजन भाजपने केले : नगरसेवक संदिप कस्पटे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारी आकडेवारीनुसार पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या दरवर्षी १० टक्क्यांनी वाढत आहे. गेल्या ९ वर्षांत शहराची लोकसंख्या तब्बल १० लाख वाढली आहे. २०११ मध्ये १७ लाख असणारी लोकसंख्या आज २७ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. लोकसंख्या वाढीचा वेग देशातील अन्य शहरांपेक्षा पिंपरी-चिंचवड शहराचा अधिक आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन शहरातील प्रत्येक नागरिकाला पुरेसे पाणी मिळावे यासाठी पुढील ५० वर्षांचे नियोजन करून कामे सुरू करण्यात आली आहेत. भामा-आसखेड, आंद्रा आणि पवना या तीन धरणातून शहरासाठी ४०० एमएलडी पाणी शासनाने मंजूर केले आहे. हे पाणी आणण्याच्या कामांना सुरूवात झाली आहे. त्यातून शहराच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे भाजप नगरसेवक संदिप कस्पटे यांनी सांगितले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ वाकड येथे आयोजित कोपरा सभेत संदिप कस्पटे बोलत होते. यावेळी संदिप कस्पटे म्हणाले, “चांगल्या व सक्षम पायाभूत सुविधा त्याचप्रमाणे भोसरी, चिंचवड, चाकण, तळेगाव येथील औद्योगिक कंपन्या तसेच हिंजवडी आयटी पार्क यांमुळे देशभरातील नागरिक वास्तव्यासाठी पिंपरी-चिंचवड शहराला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या शहराची लोकसंख्या देशातील अन्य शहरांच्या तुलनेत जास्त वाढत आहे. सरकारी आकडेवारीनुसार पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या दरवर्षी १० टक्क्यांनी वाढत आहे. १९८८ मध्ये शहराची लोकसंख्या ३ लाख ७६ हजार होती. ती २०११ मध्ये १७ लाख ३० हजार १३३ वर पोचली. गेल्या ९ वर्षांत या लोकसंख्येत तबब्ल १० लाखांची भर पडली आहे. आजमितीला शहराची लोकसंख्या २७ लाखांहून अधिक आहे.

एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत पवना धरणातून पिण्याच्या पाण्याचा दररोज पुरवठा केला जातो. पवना नदीवर रावेत येथे असलेल्या बंधाऱ्याजवळून पाणी उचलून त्यावर जलशुद्धीकरणाची प्रक्रिया केल्यानंतर हे पाणी नागरिकांना विविध भागांतील पाण्याच्या टाक्यांमधून पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते. राज्याच्या जलसंपदा खात्याने २०११ मध्ये पिंपरी-चिंचवडमधील १७ लाख लोकसंख्येला पवना धरणातील एकूण पाणीसाठ्यांपैकी ३७९ एमएलडी एवढे पाणी मंजूर केले. गेल्या ९ वर्षांत शहराची लोकसंख्या १० लाखांनी वाढल्यानंतर देखील जलसंपदा खात्याने जेवढ्या पाण्याला मंजुरी दिली, तेवढेच म्हणजे ३७९ एमएलडी पाणीच आजच्या लोकसंख्येला पुरविले जात आहे. याचाच अर्थ १७ लाख लोकसंख्येसाठी मंजूर पाणी आज २७ लाख लोकांची तहान भागवत आहे. त्यामुळेच शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे.

या समस्येवर मात करण्यासाठी सत्ताधारी भाजपने पुढील ५० वर्षांचे नियोजन करून शहरासाठी अतिरिक्त पाणी आणण्याचे काम हाती घेतले आहे. सरकारने पिंपरी-चिंचवड शहरासाठी भामा-आसखेड या धरणातील १६७ एलएलडी, आंद्रा धरणातील १०० एमएलडी आणि पवना धरणातील १३३ एमएलडी असे एकूण ४०० एमएलडी पाण्याचे आरक्षण मंजूर केले आहे. हे पाणी आणण्यासाठी सिंचन पुनर्स्थापन खर्चाच्या पहिल्या हप्त्यापोटी महापालिकेने आंद्रा धरणासाठी २० कोटी, भामा-आसखेड धरणासाठी २० कोटी ८७ लाख आणि पवना धरणासाठी १० कोटी अदा केले आहेत. हे पाणी चिखली येथील नियोजित जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यासाठी याठिकाणी १०० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. त्यासाठी १४४ कोटींच्या प्रकल्प कामाला भूमीपूजनानंतर सुरूवात करण्यात आली आहे.

पुणे शहरासाठी देखील भामा-आसखेड धरणातून पाणी नेण्यात येत आहे. त्यांचा हा प्रकल्प जानेवारी २०२० मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये असलेले वाघोली पाणीपुरवठा योजनेचे ३० एमएलडी पाणी आपल्याच शहरासाठी घेण्याचे नियोजन आहे. तसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासित केलेले आहे. तसेच अमृत योजनेअंतर्गत शहरात नवीन १९ पाण्याच्या टाक्या उभारून त्या त्या भागाला पुरेसे पाणी पुरविण्याचा प्रकल्प अहवालही तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतून संपूर्ण शहरात नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या सर्व नियोजनातून शहराची पुढील ५० वर्षांची पाण्याची गरज भागविण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या शहरात जाणवत असलेली पाण्याची समस्या ही नियोजनाअभावी नाही तर लोकसंख्यावाढीमुळे निर्माण झालेली आहे, हे शहरातील नागरिकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करणे तितकेच आवश्यक असल्याचे संदिप कस्पटे यांनी सांगितले.”

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like