‘या’ नदी खोर्‍यातील 38 धरणांमधील पाणीसाठ्यात चिंताजनक घट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- भीमा आणि कृष्णा नदी खोर्‍यात असलेल्या 38 धरणांमधील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे धरणांमधील पाण्याचा बेसुमार वापर सुरू आहेच याशिवाय उन्हाळ्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण वाढले आहे. या दोन्ही गोष्टींचा धरणांतील पाण्याच्या पातळीवर गंभीर परिणाम होत आहे. जलसंपदा विभागाच्या वतीने याबाबत माहिती दिली आहे.

नुकत्याच उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्याचे सर्वत्र जाणवत आहे. शिवाय आता फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा सुरू आहे. उन्हाच्या वाढत्या प्रणामाचा परिणाम पश्‍चिम महाराष्ट्रातील भीमा आणि कृष्णा खोर्‍यात असलेल्या 38 धरणांमधील पाणीसाठ्यावर होत आहे. मागील आठवड्यातील पाणीसाठा आणि या आठवड्यातील पाणीसाठा पाहता या आठवड्यातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसत आहे. आणखी उन्हाळ्याचे उर्वरीत तीन-चार महिने पाण्याची स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. उन्हाळी आवर्तन आणि नागरिकांना पिण्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचे नियोजन आतापासूनच करणे गरजेचे आहे. त्यामुळे पाण्याचा बेसुमार होणाऱ्या वापराला आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे.

सध्या भीमा खोर्‍यात असलेल्या धरणांमधील पाणीसाठा 41.70 टक्के आहे. हा पाणीसाठा मागील वर्षी याच दिवसात 57.59 टक्के इतका होता. तर दुसरीकडे कृष्णा खोर्‍यातील धरणांमधील पाणीसाठा 55 ते 56 टक्क्यांवर आला आहे. मागील काही दिवसांपासून उन्हाच्या झळा वाढताना दिसत आहे. परिणामी धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होण्याची प्रक्रिया सुरु झाली असून त्याचे प्रमाणही वाढले आहे. याचा परिणाम म्हणजे धरणातील पाणीसाठ्यात घट होताना दिसत आहे.