पुण्याचा पाणी पुरवठा पुर्ववत, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पाटबंधारे विभागाने पुणे पालिकेचा पाणी पुरवठा काल अचानक बंद करण्यावरून उदभवलेल्या वादाच्या परिस्थितीवर आज तात्पुरता तोडगा निघाला. महापौर, महापालिका आयुक्त आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये आज झालेल्या बैठकीत तूर्तास पूर्वीप्रमाणे पाणी पुरवठा करण्याचा तसेच पुढील काही दिवसात पाण्याची उपलब्धता पाहून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय घेण्यात आला, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

या बैठकीला सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, मुरलीधर मोहोळ, पाटबंधारे विभागाचे अधिकारी पांडुरंग शेलार, चोपडे, व्ही. जी. कुलकर्णी उपस्थित होते. महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले, की बैठकीमध्ये पुणे शहराला सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी २५ जानेवारी पर्यंत १३५० एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येईल. त्यानंतर मुख्यमंत्री, जसंपदामंत्री, पालकमंत्री यांच्या उपस्थितीत एकत्र बैठक होईल. या बैठकीत जो निर्णय होईल, त्यानुसार पुढील पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

लोकसंख्या वाढ पाहता पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी १३५० एमएलडी पाण्याची गरज आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निदर्शनास आणून देण्यात येईल. पुणेकरांना पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू, असेही टिळक यांनी नमूद केले.

दरम्यान, काल दुपारी पाटबंधारे विभागाने पर्वती जलकेंद्राला करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्या पैकी २५० एमएलडी चा पाणी पुरवठा थांबवीला होता. मागील तीन महिन्यात पाटबंधारे विभागाने सलग तिसऱ्यांदा पाणी थांबविल्याने पाटबंधारे विभाग आणि पालिका अशी वादाची स्थिती निर्माण झाली होती. यामध्ये वेळोवेळी मध्यस्थी करणारे मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही पाणी पुरवठा थांबवल्याने पाटबंधारे विभागाबद्दल रोष व्यक्त करण्यात येत होता तर सत्ताधाऱ्यांवर सर्वसामान्य स्तरातून टीका करण्यात येत होती.