चोरीसाठी आचारसंहिता ; ‘चोरी’च्या पैशातून गावासाठी केली ‘ही’ योजना

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुका आता कोणत्याही क्षणी जाहीर होतील. त्यापाठोपाठ आचारसंहिता लागू होईल. निवडणुक काळात काय काय करायचे नाही, याची मोठी जंत्री निवडणुक आयोगाने घालून दिली आहे. पण, ही पांढऱ्या कपड्यातील लोकांसाठी आहे. अशीच एक आचारसंहिता काळ्या कपड्यातील काही लोकांनी आपली आपणच स्वत:वर घालून घेतली आहे. एन. आर. आय. पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या टोळीतील दोघांना पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ही आचार संहिता समोर आली. याशिवाय त्यांनी घरफोड्यांमधून मिळालेल्या पैशांमधून गावामध्ये पाणीपुरवठा योजना राबविल्याचे आढळून आले आहे.

अशी आहे त्यांची स्वत:ची आचारसंहिता-

मराठी घरात चोरी करायची नाही.

आठवड्याच्या शेवटी व सण, उत्सवाच्या दिवशी गुन्हेगारी कारवाया बंद.

दुपारी ११ ते ३ या वेळेमध्येच घरफोडी करायची.

ज्ञानेश्वर बबन बांगरे आणि अनंत भिकू कांबळे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून तब्बल १३० तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ४१ लाख ७८ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. दागिने विकत घेणाऱ्या रतनप्रकाश यालाही अटक केली आहे. वाशीमधील तामसी गावामध्ये राहणारा ज्ञानेश्वर सुरक्षारक्षक म्हणून काही दिवस काम करत होता. तर अनंत कांबळे याचा केबल व्यवसाय व गावाकडे राइस मिल आहे. पनवेलमधील पेट्रोलपंपावर या दोघांच्या वाहनांची टक्कर झाली. पहिल्यांदा भांडण व नंतर मैत्री झाली. दोघांनीही घरफोडी करण्याचा निर्णय घेतला. स्क्रू ड्रायव्हरच्या साहाय्याने काही क्षणात दरवाजाचे टाळे उघडायचे व घरांमध्ये जाऊन किमती साहित्य घेऊन पळ काढत होते. २०१७ पासून त्यांनी तब्बल २६ ठिकाणी घरफोडी केल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा – पुण्याच्या ग्राहकाकडून बारबालाच्या अपहरणाचा प्रयत्न

या दोघांनी स्वत:साठी आचारसंहिता घालून घेतली असल्याचेही तपासामध्ये उघड झाले. दोघांनीही कोणत्याही स्थितीमध्ये आतापर्यंत एकदाही मराठी माणसाच्या घरी चोरी केलेली नाही. दुपारी ११ ते ३ या वेळेमध्येच घरफोडी करायची. चोरी करताना घरामध्ये कोण नाही हे तपासण्यासाठी बेल दाबायची. घराचा दरवाजा उघडला तर काहीतरी कारण देऊन तेथून पळ काढायचा. बेल दाबल्यानंतर त्या घरातील कोणी आवाज वाढवून बोलले तर त्या घरामध्ये पाळत ठेवून चोरी करायचीच, असा निर्धार ते करत होते.

वाशीमध्ये राहणाऱ्या ज्ञानेश्वरने मूळ गावामध्ये पाणीपुरवठ्यासाठीच्या योजनेला मदत केली होती. तळोजाजवळ घरही खरेदी केल्याचे निदर्शनास आले. अनंत याने केबल व्यवसायासाठीचे साहित्य घेतल्याचेही उघडकीस आले आहे.