पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांचा आजपासून ‘संप’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – साई सहारा एजन्सीने टँकरचे भाडे थकविल्याने श्रीगोंदा तालुक्यातील पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी आज सकाळपासून संप सुरू केला आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विस्कळीत झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा ठेका साई सहारा एजन्सीचे सुरेश पठारे यांच्याकडे आहे. टँकर मालकांच्या भावना विचारात घेऊन 10 जूनला टँकर भाडे अदा करू, असे आश्वासन त्यांनी दिले होते. पण टँकर मालकांचे समाधान झाले नाही. त्यांनी जोपर्यंत गटविकास अधिकारी, तहसीलदार यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत, तोपर्यंत टँकर बंद आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार केला आहे.

श्रीगोंदा तालुक्यात 67 पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू आहेत. आज सकाळी 11 वाजता पंचायत समितीत गटविकास अधिकारी प्रशांत काळे साईसहाराचे सुरेश पठारे व टँकर चालकात बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे. ऐन दुष्काळात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कोलमडणार असल्याने सर्व यंत्रणा विस्कळित झाली आहे.