अरे देवा ! बापाच्या मृत्यूनंतरही मुलानं 8 वर्ष उकळली तब्बल 92 लाख पेन्शन

रोहतक : वृत्तसंस्था –   वडीलांचे निधन झाल्यानंतर आठ वर्षे त्यांच्या नावावर पेन्शन घेऊन 92 लाख उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडीलांच्या नावावर बोगस कागदपत्र देऊन मुलाने पेन्शन उकळली. आठ वर्षे मुलगा पेन्शन घेत असल्याचा सुगावा अधिकाऱ्यांना देखील लागला नाही. ज्यावेळी अधिकाऱ्यांना हा फसवणुकीचा प्रकार समजला तोपर्यंत आरोपी मुलाने सरकारला 91.61 लाख रुपयांचा चुना लावला होता. या संपूर्ण प्रकरणाबाबत ट्रेझरी ऑफिसर राजवीर सिंह यांच्या तक्रारीवरून सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

सेवानिवृत्त कर्मचारी ए.एसी. बहरा यांच्या निधनानंतरही त्यांचा मुलगा नरेश कुमार या भामट्याने वडिलांचे बोगस जिवंत असल्याचा दाखला मिळवला. हा दाखला सादर करून आठ वर्षे पेन्शन घेतली अशी तक्रार ट्रेझरी ऑफिसर राजवीर सिंह यांनी पोलिसांत दिली. यावेळी आरोपींनी दोन वेळा आपल्या वडिलांचा बनावट हयात असल्याचे बोगस प्रमाणपत्र कोषागार कार्यालय व बँकेत सादर केले.

1 डिसेंबर 2011 रोजी सेवानिवृत्त कर्मचारी बहरा यांचे निधन झाले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची पेन्शन थांबायला हवी होती. मात्र, त्यांची पेन्शन पुढे आठ वर्षे सुरू राहिली. मृत कर्मचाऱ्याचा मुलगा नरेश कुमार एटीएमद्वारे किंवा कधीकधी चेकद्वारे किंवा ऑनलाईन शॉपिंगद्वारे पेन्शनची रक्कम काढत होता.