Mumbai High Court : कंगनाचं ‘मुंबई-महाराष्ट्रा’बद्दलचं विधान, हायकोर्टानं नोंदवलं ‘हे’ निरीक्षण

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अभिनेत्री कंगना राणावत हिनं मुंबई आणि महाराष्ट्राविषयी काय म्हटलं याच्याशी आम्हीही सहमत नाही. आपण सर्व महाराष्ट्रीयन आहोत आणि आम्हालाही महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे असं अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण आज मुंबई हायकोर्टानं नोंदवलं आहे. कगंनानं केलेल्या वक्तव्यावर अशा पद्धतीनं प्रतिक्रिया देणं योग्य आहे का ? असा सवालही कोर्टानं शिवसेना नेते संजय राऊत यांना केला आहे.

संजय राऊत यांनी केलल्या कानून क्या है या विधानाचा समाचार घेताना मुंबई हायकोर्टानं कठोर निरीक्षणं नोंदवली. संजय राऊत हे नेते आहेत ते कोणी सर्वसामान्य माणूस आहेत का ? याचिकादारानं जे काही म्हटलं त्याच्याशी आम्हीही सहमत नाही. परंतु त्याच्यावर अशा प्रकारे प्रतिक्रिया द्यायची का ? ही पद्धत असते का बोलायची ? ते नेते असल्यानं त्यांनी उदारतेनं त्याकडे पाहून दुर्लक्ष करायला हवं होतं. असं काही तरी बोलून ते हीच शिकवण इतरांना देत आहेत का अशा शब्दात न्या शाहरुख काथावाला आणि न्या रियाझ छागला यांच्या खंडपीठानं नाराजी व्यक्त केली.

मी एका वृत्तवाहिनीला 5 सप्टेंबर रोजी दिलेल्या मुलाखतीत कंगनाला अपशब्द किंवा आक्षेपार्ह भाषा वापरत धमकावलेलं नाही. मी या आरोपांचं खंडन करतो असं म्हणणं संजय राऊतांनी हायकोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मांडलं आहे. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाविषयी बोललो होतो हे खरे आहे परंतु तिला कोणत्याही प्रकारे धमकी दिली नाही. तिनं महाराष्ट्राविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्यानं प्रतिक्रिया दिली. कानून क्या है म्हणताना कायद्याचा अनादर करण्याचा हेतू नव्हता असं म्हणणंही संजय राऊत यांच्या वकिलातर्फे मांडण्यात आलं आहे. त्यावर कोर्टानं आपली महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली.

युक्तिवाद नंतर मांडण्याची मुभा

संजय राऊत यांच्यातर्फे आज युक्तिवाद होऊ शकला नाही. राऊत यांचे वकिल अॅड प्रदीप थोरात यांच्या सासऱ्यांचे आज दुपारी 12.30 वाजता निधन झाले. त्यामुळं ते आज युक्तिवाद मांडण्यास असमर्थ आहेत असं म्हणणं थोरात यांच्या ज्युनियर वकिलानं कोर्टात मांडलं. त्यावर मुंबई हायकोर्टानं त्यांना नंतर युक्तिवाद मांडण्याची मुभा दिली. दरम्यान आज दुपारी 3 वाजता युक्तिवाद मांडण्याचे निर्देश हायकोर्टानं राऊत यांच्या वकिलांना दिले होते.