आम्ही स्पर्धेला घाबरत नाही; मुख्यमंत्र्यांनी CM योगींना ठणकावले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या राज्यातील गुंतवणुकीसाठी मुंबईत येत आहे. तत्पूर्वी गुजरातने परकीय गुंतवणुकीत देशात नंबर वन असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. मंगळवारी इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत अयोजित कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी स्पर्धेला आम्ही घाबरत नाही. कुणी ओढून ताणून येथून काही घेऊन जाणार असेल, तर शक्य होणार नाही. महाराष्ट्रातील उद्योग महाराष्ट्रातच राहतील, असे ठणकावून सांगितले आहे.

ठाकरे म्हणाले, ‘महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य असून, आजही उद्योजकांना राज्याचे आकर्षण आहे. राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत, उलट इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राला एक इतिहास आहे. राज्यात नवीन गुंतवणूक येत आहे. कोणतीही अडचण येत असेल तर ती सोडवण्यासाठी सरकार तुमच्यासोबत असते हे तुम्हाला सांगता येते, असेही ठाकरे यांनी सांगितले.

उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्ससारख्या संस्थेने पुढाकार घेतल्यास शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल.

योगींच्या भेटीवर भाजप नेत्यांचे मौन का?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन बॉलिवूडने उत्तर प्रदेशात यावे, असे आवाहन केले होते एवढेच नाही तर महाराष्ट्रात येऊन इथले उद्योग तिकडे नेण्याची भाषाही आदित्यनाथ यांनी केली. यावर काहीही न बोलता राज्यातील भाजप नेते गप्प का बसले आहे,त असा सवाल सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे.

ते म्हणाले, भाजपच्या ५ वर्षांच्या काळात दिवसाढवळ्या महाराष्ट्रातील अनेक उद्योग अन् कार्यालये गुजरातला पळवण्यात आली. त्यावेळीही राज्यातील भाजप नेते गप्प बसले.

You might also like