देशात ‘कोरोना’ संक्रमितांची संख्या 8 लाखाच्या टप्प्यात, सरकारनं सांगितलं ‘या’ गोष्टीमुळं टेन्शन नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाच्या एकुण संक्रमितांची संख्या 8 लाखाच्या खुप जवळ पोहचली आहे. मात्र, आम्ही या संख्येमुळे चिंतेत नसल्याचे सरकारने म्हटले आहे. आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी शुक्रवारी म्हटले की, देशात कोरोना रिकव्हरी रेट जास्त आहे आणि मृत्यूदर खुपच कमी आहे, यासाठी केसेसच्या संख्येची चिंता नाही. त्यांनी पुन्हा सांगितले की, देशात सध्या कम्युनिटी ट्रान्समिशन नाही. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, कोविड-19 च्या रूग्णांचा रिकव्हरी रेट 63 टक्के आहे आणि मृत्यूदर अवघा 2.72 टक्के आहे. आम्ही केसेसच्या संख्येमुळे चिंतेत नाही. आम्ही टेस्टींग वाढवत आहोत. जेणेकरून जास्तीत जास्त केसेसची माहिती मिळावी आणि त्यांच्यावर उपचार करता यावेत. सुमारे 2.7 लाख टेस्ट प्रतिदिन होत आहेत.

देशात कम्युनिटी ट्रान्समिशनची स्टेज असल्याचे वृत्त नाकारात ते म्हणाले, एवढा मोठा देश असतानाही आपण कम्युनिटी ट्रान्समिशन स्टेजमध्ये पोहचलेलो नाही. परंतु, काही अशी पॉकेट्स आहेत जेथे संसर्गाचा दर काहीप्रमाणात जास्त असू शकतो. भारतात शुक्रवारी कोविड-19ची एका दिवसात सर्वाधिक 26,506 नवी प्रकरणे समोर आली, ज्यामुळे देशात कोरोना व्हायरस संक्रमणाची एकुण प्रकरणे वाढून 7,93,802 झाली आहेत. कोविड-19 च्या आणखी 475 रूग्णांच्या मृत्यूनंतर देशात संक्रमणाने मृत्यू झालेल्या लोकांची संख्या वाढून 21,604 झाली आहे. कोरोना व्हायरस संसर्गाची माहिती मिळण्यासाठी देशात आतापर्यंत 1.1 कोटीपेक्षा जास्त नमुण्यांची तपासणी झाली आहे.

आयसीएमआरनुसार 9 जुलैपर्यंत देशात 1 कोटी 10 लाख 24 हजार 491 नमुण्यांची तपासणी करण्यात आली, ज्यापैकी 2 लाख 83 हजार 659 नमुण्यांची तपासणी गुरूवारी झाली. देशात 4,95,512 रूग्णा संसर्गातून बरे झाले आहेत, तर कोरोना व्हायरसने संक्रमित 2,76,685 रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. एक अधिकार्‍याने सांगितले की, आतापर्यंत सुमारे 62.42 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.