…तर आम्ही पंतप्रधानपदही सोडायला तयार : काॅंग्रेसचा नवा ‘डाव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकांच्या निकालाला अजून एक आठवडा बाकी आहे. मात्र काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. काल सोनिया गांधी यांनी सर्व छोट्या- मोठ्या राजकीय पक्षांना पत्र लिहून २३ तारखेच्या बैठकीचे निमंत्रण दिले आहे. तर आज काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी नवीन वक्तव्य करून भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे. यासाठी काँग्रेसने नवीन डाव टाकला आहे.

आघाडी सरकारमध्ये आम्हाला पंतप्रधानपद नाही मिळालं तरी काहीच अडचण नाही,’ मात्र भाजपला सत्तेतून हटवणे आमचे लक्ष असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जर सर्व पक्ष काँग्रेसच्या बाजूने उभे राहणार असतील तर देशाचं नेतृत्व करायला तयार आहोत, हे आम्ही आधीच स्पष्ट केलं आहे, असेदेखील आझाद यावेळी म्हणाले. मात्र काही दिवसांतच काँग्रेसने पंतप्रधानपद सोडण्यास तयार होणे म्हणजे केंद्रात काँग्रेसला यश मिळणार नसल्याची लक्षणे असल्याचे राजकीय विश्लेषकांनी म्हटले आहे.

दरम्यान, जोपर्यंत आम्हाला पंतप्रधानपदाची ऑफर मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार असल्याचे देखील यावेळी आझाद यांनी सांगितले. आम्हाला २७२ जागा मिळणार नसल्या तरी भाजपचे देखील एकहाती सरकार येणार नसल्याचा उल्लेख देखील त्यांनी यावेळी केला.