घाबरलो असतो तर घरी बसलो असतो

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – आम्ही कोणाला घाबरत नाही. घाबरलो असतो तर घरी बसलो असतो, राज्यभर फिरून नव्वद सभा घेतल्या नसत्या, असा शब्दात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे. नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. तसंच समीर भुजबळ यांच्या उमेदवारीवरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

राज्यात आणि नाशिकमध्ये गेल्या साडे चार वर्षात विकास थांबला आहे. भुजबळांना श्रेय मिळू नये म्हणून विकासकामे केली नाहीत. नाशिक बेवारस झालंय. त्याला विचारणार कोणी नाही. जनतेत भाजपविषयी प्रचंड रोष आहे. त्यामुळे यंदा नाशिकच्या दोन्ही जागा आम्ही जिंकू, असा दावा भूजबळांनी केला आहे.

नाशिकमध्ये माजी खासदार समीर भुजबळ यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. हा निर्णय पक्षाने कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे घेतला आहे, असे स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिले. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल दोघेही राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांची मुदत २०२० पर्यंत आहे. ही जागा रिकामी झाल्यावर उगीचच अन्य कोणाला गेली असती, असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, भाजप विरोधकांचे राज्यसभेतील संख्याबळ कमी होऊ नये म्हणून शरद पवार यांनी निवडणूक न लावण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप विरोधी आणि धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये यासाठी आम्ही खुप प्रयत्न केले. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी आग्रह धरला. आम्ही संघाच्या बाजुने नाही. संघाविषयी आम्ही एकत्रित मसुदा करायला तयार होतो. त्यांना चार जागा देण्याची तयारी होती. मात्र, प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्यात रस नव्हता, असं त्यांचे मत असल्याचे भुजबळांनी सांगितलं.