Rajiv Bajaj : ‘सरकार म्हणेल तसं चालायला आम्ही मेंढरं नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याला विरोध दर्शवत बजाज उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी सरकार म्हणेल तसं चालायला आम्ही मेंढरं नाही, असे वक्तव्य केले आहे.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लॉकडाऊन सदृश्य नियम लागू करण्यात आले. त्यावरून विरोधकांकडून टीका केली जात असताना हे नवे नियम लागू करण्यापूर्वी राजीव बजाज यांनीही वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, आतातरी सर्व कंपन्यांच्या सीईओंनी उभं राहायला हवं आणि काहीतरी बोलायला हवं. कारण कोरोनासारख्या बिकट परिस्थितीत सरकार सांगेल तसं चालायला आपण मेंढरं नाहीत. तसेच निवडणूक सभा आणि धार्मिक मेळाव्यांमध्ये राजकीय नेते कोरोनाच्या नियमांचे उघडपणे उल्लंघन करतात तर लॉकडाउन, सोशल डिस्टन्सिंगचे नियम इतरांवर थोपवतात. नेत्यांच्या या दुटप्पी वागण्यावर उद्योगपती गप्प का आहेत? असा सवालही राजीव बजाज यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, मागील वर्षी जशी परिस्थिती होती त्या सारखाचीच परिस्थिती आपल्याला ओढवून घ्यायची नसेल तर यासाठी आपण असं काय वेगळं करत आहोत? असा सवाल आपण स्वतःला विचारायला हवा असेही लॉकडाऊनला समर्थन देणाऱ्या नेत्यांना उद्देशून बजाज यांनी केला आहे.