झालेली ‘अवहेलना’ आम्हाला आवडली नाही, काँग्रेसकडून एकनाथ खडसेंना ‘ऑफर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नाराज भाजप नेते एकनाथ खडसे यांनी विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीत काल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची खडसेंनी भेट घेतल्यानंतर आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दिल्लीत भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या खडसेंनी भाजप नेत्यांची भेट न घेतात परतवारी केली. दरम्यान खडसेंना आता काँग्रेसने ऑफर दिली आहे.

एकनाथ खडसे भाजपवर नाराज असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून दिसत आहे. पक्षाकडून असाच अन्याय होत राहिला तर वेगळा विचार करावा लागेल असा इशारा देखील त्यांनी दिला. त्यामुळे ते घेत असलेल्या इतर पक्षांच्या नेत्यांची भेटी महत्वाच्या मानल्या जात आहेत.

नाथाभाऊ काँग्रेसमध्ये आले तर उत्तमच होईल, असे काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. नाथाभाऊ आमचे आवडते व्यक्तिमत्व आहे, त्यांची अवहेलना झालेली आम्हाला देखील आवडले नाही. त्यांच्याकडून आम्हाला प्रस्ताव आला नाही, आम्ही देखील काही प्रस्ताव दिला नाही. परंतू अशी माणसे पक्षात आली तर आनंदच होईल, पक्षाला बळकटी मिळेल असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. तसेच, भाजपने त्यांचे आमदार कुठे जातील याची काळजी करावी असा खोचक टोला देखील बाळासाहेब थोरातांनी लगावला.

विधानसभेत अपेक्षित यश न मिळाल्याने आणि पक्ष सत्तेपासून दूर राहिल्यानंतर त्यांची पक्षासंबंधित नाराजी उघडपणे बोलून दाखवली. दिल्लीत गेलेल्या एकाही नेत्यांची खडसे यांनी भेट घेतली नाही. अमित शाह लोकसभेत होते, तसेच जे. पी. नड्डा, महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांची देखील खडसेंनी भेट घेतली नाही. त्यामुळे खडसे वेगळी वाट धरणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खडसेंनी पवारांच्या भेटीनंतर सांगितले की सिंचन प्रकल्पांच्या प्रश्नावर पवारांशी चर्चा केली. विधानसभा निवडणूक सुरु होती तेव्हा खडसेंनी पक्षावर अनेकदा टीका केली. त्यानंतर आता वेगळा विचार करु असा इशारा दिला. आता खडसे ठाकरेंची भेट घेणार आहेत. त्या बाळासाहेब थोरातांच्या वक्तव्याने खडसे काय विचार करणार याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Visit : Policenama.com