छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आम्हाला ‘ज्ञान’ देण्याची ‘गरज’ नाही, राऊतांचा ‘रुद्रावतार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना केलेले वादग्रस्त पुस्तक मागे घेतले असतानाच आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वशंजावरून राजकारण पेटले आहे. संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्याकडे छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे मागितल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्ञान देण्याची गरज नसल्याचा टोला उदयनराजे भोसले यांना लगावला आहे.

आमच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाद्यांबद्दल नेहमीच आदराची भावना राहिली आहे. जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव येते त्यावेळी त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याची भूमिका शिवसेनेने बजावली आहे. त्यामुळे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्ञान देण्याची गरज नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. उदयनराजेंनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी उदयनराजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत असे विधान केले होते. यावरूनच निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज (गुरूवार) सकाळी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे आणि देशाचे नव्हे तर विश्वाचे दैवत आहे. आम्हाला शिवरायांबाबत सार्थ अभिमान आहे. छत्रपतींच्या गाद्यांबाबत आमच्या मनात नेहमीच आदराची भावना राहिली आहे. शिवरायांचे वंशज असलेल्या शिवेंद्रराजे आणि संभाजीराजेंबद्दल आमच्या मनात कायम आदर राहिला आहे. कोल्हापूरचे सध्याचे छत्रपती शाहू महाराज आणि बाळासाहेब ठाकरे याचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. उदयनराजेंच्या मातोश्री कल्पनाराजे या शिवसेनेमध्ये असताना त्यांनी निवडणूकही लढली होती. अशाप्रकारे शिवसेनेचा आणि छत्रपती शिवरायांच्या वारसदारांचा संबंध राहिला असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/