ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! पुणे, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगलीसह ‘या’ 18 जिल्ह्यांमध्ये होम क्वारंटाईन बंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढली. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यात रुग्णांच्या संख्येचा आलेख खाली येत आहे. नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के इतके आहे आणि पॉझिटिव्हीटी रेट 12 टक्क्यांवर आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (मंगळवार) प्रसारमाध्यमांना दिली आहे. यावेळी टोपे यांनी महत्त्वाच्या निर्णयांची माहिती दिली.

कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी होत असले तरी त्यावर अद्याप नियंत्रण मिळालेले नाही. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु असून कोरोना चाचण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात उठसूट कुणाचीही कोरोना चाचणी करणं आता पूर्णपणे बंद करण्यासाठीच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील हाय रिस्क आणि कमी धोका असलेल्या व्यक्तींच्यांच कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत. ठिकठिकाणी कोरोना चाचण्या केल्यानं पॉझिटिव्हीटी रेटवर परिणाम होतो, अशी माहिती टोपे यांनी दिली.

राजेश टोपे यांनी सांगितले की, सध्याच्या स्थितीला राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट एकूण राज्याच्या पॉझिटिव्हिटी रेटपेक्षा जास्त आहे, त्यांना दोन महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यापैकी पहिली सूचना, होम आयसोलेशन 100 टक्के बंद करुन कोविड सेंटर वाढवा आणि तिथे रुग्णांना आयसोलेट करा. त्यासाठी अतिरिक्त कोविड सेंटर उभारले जाणार आहेत. तसेच राज्यातील सर्व रुग्णालयांचं फायर ऑडिट करण्यास प्राधान्य देणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

या जिल्ह्यात होम क्वारंटाईन बंद

पुणे, नागपूर, रायगड, बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद

लॉडाऊनसंदर्भातील निर्णय गुरुवारी

राज्यात 1 जूनपासून चार टप्प्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार आहे का ? या प्रश्नाला उत्तर देताना राजेश टोपे यांनी सांगितले की, लॉकडाऊन संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी बैठक घेणार आहेत. या बैठकीत लॉकडाऊन बाबत निर्णय ते घेतील. असे राजेश टोपे यांनी सांगितले.