आम्ही दिलेला शब्द पाळला, ‘आरे’च्या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे आता मेट्रो 3 साठी कोणत्याही परिस्थितीत कारशेड होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून आम्ही शब्द पाळला, असे म्हटले आहे. आरे जंगल वाचवण्यासाठी आम्ही तुरुंगात गेलो, पण आधीचे सरकार नमले नसल्याची आठवण त्यांनी करुन दिली.

मेट्रो कारशेड आरेच्या जमिनीवर होणार नाही याचा उच्चार मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात एका बैठकीत केला होता. एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशा रितीने विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिले उदाहरण ठरणार असल्याचे त्यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत स्पष्ट केलं. वर्षा निवास्थानी झालेल्या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात प्रस्तावना केली. दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी या प्रस्तावासंदर्भात पुढाकार घेतला. या बैठकीस वन मंत्री संजय राठोड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव वने मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव पदुम अनुपकुमार इत्यादी उपस्थित होते.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन आमच्या सरकारने शब्द पाळल्याचे म्हटले आहे. तसेच, आपण या आंदोलनावेळी तुरुंगात गेलो होतो, याची आठवणही करुन दिली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे अभिनेते फराहन अख्तरनेही स्वागत केले आहे. वेलकम ए डिसीजन असे ट्विट करुन मुख्यमंत्र्यांचे ट्विट रिट्विट केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे वृक्षप्रेमींना आनंद झाला असून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण आदित्य ठाकरेंचा आरेच्या वृक्षतोडीला विरोध होता.