अजितदादांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली, भाजप नेत्याची जाहीर खंत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली. या निवडणूकीत भाजपचा पराभव झाला असून हा पराभाव भाजप नेत्याच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे भाजपचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी थेट अजित पवारांच्या पायगुणालाच दोष दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली, अशी खंत प्रविण दरेकर यांनी बोलून दाखवली आहे.

या निवडणूकीमध्ये नीलम गोऱ्हे यांची उपसभापतीपदी निवडीची घोषणा झाल्यानंतर अजित पवार बोलण्यासाठी उभे राहिले होते. उपसभापती निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे असते, या गोष्टी महत्त्वपूर्ण असतात. पण भाजपने तसे केले नाही, असे म्हणत अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला. नीलम गोऱ्हे यांचा पायगुण चांगला आहे. कारण त्या आधी उपसभापती झाल्या आहेत आणि महाविकास आघाडी सरकार आले आहे, असं अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले होते. त्यावर बोलताना प्रवीण दरेकर यांनी आपली खंत बोलून दाखवली.

अजित पवार यांनी नीलम गोऱ्हे यांचे अभिनंदन करताना म्हणाले, मागील सरकारमध्ये त्या मंत्री होतील पण तसं झालं नाही. महाविकास आघाडी सरकार आल्यावर मंत्री म्हणून विचार होईल असे वाटले होते. पण झाले नाही, पण गोऱ्हेताई उपसभापतीपद महत्त्वाचे आहे. तुम्ही या पदावरुन न्याय देऊ शकता. सीएम ठाकरे यांचे तुमच्याकडे लक्ष आहे. पक्ष नेतृत्वास तुम्हाला संधी दिली असे अजित पवार म्हणाले.

विशेष म्हणजे प्रवीण दरेकर यांनी उपसभापतीपदाची निवडणूक होऊ नये म्हणून बरेच प्रयत्न केले. सोमवारी नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात उमेदवार उभा केला आणि आज थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली. विशेष म्हणजे भाजपकडे संख्याबळ नसतानाही निवडणूक रद्द करण्याची खेळी केली. मात्र, शिवसेनेने भाजपचा हा डाव उधळून लावला आहे. उपसभापतीपदावर याआधी नीलम गोऱ्हे यांची निवड झाली होती. आता पुन्हा एकदा याच पदावर गोऱ्हे यांची निवड करण्यात आली आहे.