Lockdown in Maharashtra : देवेंद्र फडणवीसांनी दिलं मुख्यमंत्री ठाकरेंना मोठं आश्वासन, म्हणाले – ‘आम्ही राजकारण थांबवतो, फक्त एकच अट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने टीका केली जात आहे. त्यानंतर आता आम्ही राजकारण बंद करतो पण तुमच्या मंत्र्यांना आणि सहकाऱ्यांनाही समज द्या, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत अजित पवार, देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. कोरोना लढ्यात कोणतेही राजकारण आणू नये. मुख्यमंत्री ठाकरे यांनी जो पक्ष राजकारण करत आहे, त्यांना समज देण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपचे किंवा कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नव्हते. त्यानंतर फडणवीस म्हणाले, ‘आम्ही राजकारण बंद करतो पण तुमच्या मंत्र्यांना आणि सहकाऱ्यांनाही समज द्या, सहकार्य आम्ही करू. पण त्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या’.

दरम्यान, राज्याला मदत व्हावी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखणे महत्त्वाचे, लॉकडाऊनबद्दलचा मध्यबिंदू काढला पाहिजे, लॉकडाऊनबद्द्ल माध्यमांना फक्त दोन ते तीन लोकांनी माहिती द्यावी, जास्त लोक बोलत राहिले तर लोकांचे कन्फ्युजन होते, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

लॉकडाऊन लावल्यास महिन्याभरात परिस्थिती नियंत्रणात
लॉकडाऊन लावल्यास महिन्याभराच्या आत आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो. पण एकमत झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही. राज्यात तरुण पिढीलाही कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होत आहे. कडक लॉकडाऊनची गरज आहे नाहीतर परिस्थिती गंभीर होईल, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.