महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्यासाठी भज्जीनं केलं ‘हे’ आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून चाचणी व्हॅनची सोय केली आहे. त्याचे शनिवारी वडगाव शेरीतील पुण्यनगरी सोसायटीत लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध फिरकीपटू हरभजनसिंग याने ऑनलाइन सहभाग घेतला होता. दरम्यान, पुणे शहर आणि महाराष्ट्र बिकट परिस्थितीतून जात आहे. महाराष्ट्रात कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे लढले पाहिजे असे त्याने सांगितले.

लोकार्पण सोहळ्यास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सभागृह नेते गणेश बीडकर, राजेश पांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महेश करपे उपस्थित होते.

हरभजन सिंग म्हणाला, मी देशासाठी खूप खेळलो; पण आता देशासाठी सामाजिक काम करण्याची वेळ आली आहे. चाचणी लवकर झाल्यास उपचार वेळेत मिळू शकतो. यामुळे चाचणी वाहन उपलब्ध करुन देण्यात आले. आपल्याला कोरोनाविरुद्धची लढाई जिंकायची आहे. या लढाईत चंद्रकांत पाटील हे आमचे कर्णधार असल्याचेही त्याने सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रवचनकारांकडून जीवन हा खेळ असून थोडा वेळ खेळायचा आणि नघून जायचे असे एकत आलो आहे. पण आता ते दिसत आहे. मंत्री आणि अधिकारी ऑक्सिजन पाहिजे म्हणून डोक्याला हात लावून बसले आहेत. या चाचणी वाहनामुळे वेळेत निदान होण्यास मदत होईल. या वाहनातून रोज सहा हजार अँटिजेन आणि दीड हजार आरटीपीसीआर चाचण्या केल्या जातील. असे सांगत शहर भाजपतर्फे आरोग्य विषयक सकारात्मक माहिती देणारा स्वतंत्र डॅशबोर्ड सुरू होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.