फडणवीसांबद्दल ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला आजच अटक करू – अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात सोशल मीडियात एक पोस्ट आणि एका पोर्टलची बातमी व्हायरल झाल्यानंतर विधानसभेत मोठा गोंधळ करण्यात आला.

काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांच्याकडून विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांच्यासंबंधी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण केल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यामुळे विरोधक जास्तच संतापले. त्यानंतर नाना पटोलेंनी वाचून दाखवलेला उल्लेख कामकाजातून काढून टाकण्यात आला. पण देवेंद्र फडणवीस यांनी या आक्षेपार्ह पोस्टवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

“चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने ही पोस्ट लिहिली आहे. आमच्या कार्यकर्त्यांना कशाबाबतही जेलमध्ये टाकलं जातं. पण, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर अद्याप कारवाई केली नाही. मी काय आहे जगाला माहिती आहे.”, असे फडणवीस यांनी ठामपणे सभागृहात सांगितले. या नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून संबधित व्यक्तीवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले तसेच त्या कार्यकर्त्याला आजच अटक केली जाईल असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.